आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

युवतीची तक्रार:विदेशात नोकरीचे आमिष देत साडेपाच लाखांनी गंडवले ; पोलिसांकडून गुन्हा दाखल

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरातील डेंटल कॉलेज भागात राहणाऱ्या एका २१ वर्षीय तरुणीला विदेशात चांगल्या पगाराची नोकरी देतो, असे सांगून तिची ऑनलाइन ५ लाख ५३ हजार रुपयांनी फसवणूक केली. या प्रकरणी फसवणूक झालेल्या तरुणीने २६ ऑगस्टला सायबर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. तक्रारीवरून पोलिसांनी अनोळखी क्रमांकाच्या मोबाइल व बँक खातेधारकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

शहरात राहणारी ही युवती नोकरीच्या शोधात असून तिला ६ जुलै २०२२ ला ऑनलाइन पद्धतीने नोकरी असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर तिला अनोळखी मोबाइल क्रमांकावरून कॉल आला. तरुणीने कॉल रिसिव्ह केला असता तिला नेदरलँडमध्ये चांगल्या पगाराची नोकरी असल्याचे सांगण्यात आले. ही नोकरी पाहिजे असल्यास काही रक्कम भरावी लागेल, ही प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय नोकरी मिळणार नाही. त्यामुळे तरुणीने समाेरील व्यक्तीने दिलेल्या खाते क्रमांकावर रक्कम पाठवली. एकदा रक्कम टाकल्यानंतर त्यांनी पुन्हा काही रक्कम भरण्यास सांगितले आणि दुसरा खाते क्रमांक दिला. तरुणीने त्यावरही रक्कम टाकली. ६ जुलै ते १० जुलै या काळात तरुणीला वेगवेगळ्या मोबाइल क्रमांकावरून आलेल्या कॉलनुसार मागणी केल्याप्रमाणे ५ लाख ५३ हजार रुपये ऑनलाइन पाठवले, मात्र तरुणीला नोकरी काही मिळाली नाही. आपली फसगत झाल्याचे तरुणीला लक्षात आले. तरुणीने वारंवार त्यांनी दिलेल्या क्रमांकावर कॉल केले असता त्यांच्याकडून प्रतिसाद येत नव्हता. अखेर तरुणीने सायबर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. तक्रारीवरून सायबर पोलिसांनी अनोळखी मोबाइल क्रमांक तसेच अनोळखी खाते क्रमांक धारकाविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायदा तसेच फसवणुकीच्या कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

अनोळखी कॉलला प्रतिसाद देऊ नये : अलीकडे सायबर क्राइमचे प्रकार खूप वाढले आहेत. त्यामुळे कोणीही अनोळखी मोबाइल क्रमांकावरून आलेल्या कॉलला प्रतिसाद देऊ नये तसेच कोणत्याही प्रकारचे अॅप डाऊनलोड करण्यास सांगितले, तर डाऊनलोड करू नका, कारण सायबर गुन्हेगार वेगवेगळ्या पद्धतींचा अवलंब करून सर्वसामान्यांना आर्थिक गंडा घालण्यासाठी प्रयत्नरत असतात.

बातम्या आणखी आहेत...