आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराअभियांत्रिकी, विज्ञान आणि कृषी क्षेत्रातील विद्यार्थ्यांनी संशोधनातून साकारलेल्या तंत्रविषयक अविष्काराला ‘डिपेक्स’च्या माध्यमातून योग्य दिशा मिळाली असून त्याद्वारे अमरावतीच्या विद्यार्थ्यांनी पाच पुरस्कार जिंकले आहेत. येथील सिपना अभियांत्रिकी महाविद्यालयात ही स्पर्धा पार पडली.
कचरा व्यवस्थापन प्रकारात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती, कम्प्युॅटर इंटेलिजन्स व सायबर सिक्युरिटी या गटात सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालय अमरावती, हेल्थकेअर व मेडिकल टेक्नॉलॉजी या गटात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती, इंडस्ट्रियल ऑटोमेशन या गटात शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय अमरावती आणि एमएसबीटीई अवॉर्ड शासकीय तंत्रशिक्षण महाविद्यालय, अमरावतीच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या प्रकल्पाला देण्यात आला. अशाप्रकारे अमरावती येथील विविध संस्थांच्या विद्यार्थ्यांनी पाच पारितोषिके प्राप्त केली.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि सृजन संस्थेच्यावतीने येथील बडनेरा रोड स्थित सिपना अभियांत्रिकी व तंत्रज्ञान महाविद्यालयात ३२ व्या डिपेक्सचे आयोजन करण्यात आले होते. त्याअंतर्गत प्रदर्शन व स्पर्धा झाली. तीन दिवस चाललेल्या या स्पर्धेतील मान्यवरांच्या निरीक्षणानंतर शेवटच्या दिवशी पुरस्कार वितरित करण्यात आले. यावेळी ही बाब स्पष्ट झाली. स्पर्धेत राज्यभरातील १९७ पेक्षा अधिक महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता. अमरावतीशिवाय इतर जिल्ह्यांनाही पुरस्कृत करण्यात आले.
या कार्यक्रमाला अभाविपच्या राष्ट्रीय कार्यकारणीचे विशेष निमंत्रित सदस्य प्रा. मिलिंद मराठे, विद्यापीठ अनुदान आयोगाचे सचिव प्रा. डॉ. मनीष जोशी, अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे सल्लागार प्रा. राजेंद्र काकडे, अभाविपच्या राष्ट्रीय मंत्री अंकिता पवार, सृजन संस्थेचे विश्वस्त आशिष उत्तरवार, डिपेक्सचे निमंत्रक ऋषिकेश पोतदार, सिपना शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव तथा संगाबा अमरावती विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेचे राज्यपालनामित सदस्य डॉ. रवींद्र कडू, तंत्रशिक्षण विद्यार्थी कार्य विभागाचे विदर्भ प्रांत संयोजक आशुतोष द्विवेदी, अभाविपचे महानगर अध्यक्ष डॉ. श्याम मुंजे आदी मान्यवर उपस्थित होते.
संचालन प्रा. स्वप्नील पोतदार यांनी केले. तर आभार अभाविपच्या महानगर मंत्री सावनी सामदेकर यांनी मानले. यावेळी अमरावतीसह विविध जिल्ह्यातील अभियांत्रिकी पदविका व पदवी महाविद्यालयांचे विद्यार्थी-विद्यार्थीनी मोठ्या प्रमाणात उपस्थित होत्या.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.