आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणी टंचाई:सलग तिसऱ्या दिवशी शहराची ‘निर्जळी’; रखरखत्या उन्हात पाण्यासाठी भटकंती

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक
  • ‘मजीप्रा’कडून जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरुच; थंड पाण्याच्या कॅनची विक्री दुप्पट

गेल्या ७२ तासांपासून शहरातील नळांना पाणीच नसल्यामुळे अमरावतीकरांची पाण्यासाठी धावाधाव सुरू आहे. रखरखत्या उन्हाळ्याचे दिवस. त्यात ४४.२ अंश सेल्सिअस तापमान. अशात जर गार पाणी मिळाले नाही तर जीवाची लाहीलाही होते. तहान शमविण्यासाठी थंड पाणी हवेच. मात्र शहरातील मुख्य जलवाहिनी फुटल्यामुळे तीन दिवसांपासून नळ कोरडे पडले आहेत. त्यामुळे शहरवासी जसे जमेल, जेथून मिळेल, तेथून पाणी मिळविण्यासाठी धावपळ करीत आहेत. कोणी घराजवळील विहिरींवर, कोणी कॅन विक्रेत्याकडे जाऊन पाणी आणत आहेत. सलग तीन दिवस उन्हाळ्यात पाणीपुरवठा बंद राहण्याची शहरातील ही पहिलीच वेळ आहे. त्यामुळे नागरिक पिण्याच्या पाण्याच्या कॅन विक्रेत्यांकडे गर्दी करीत असून तेथेही पाण्यासाठी रांगा लागलेल्या दिसून आल्या. कोणी सायकलच्या कॅरिअरवर, कोणी दुचाकीवर, कोणी चारचाकीवर तर कोणी ऑटोत कॅन घेण्यासाठी विक्रेत्याकडे येत आहेत. शहरातील २५० कॅन विक्रेत्यांकडे सध्या दुप्पटीने पाण्याची मागणी वाढली आहे.

गुरुवार २ जून रोजी सायंकाळी मुख्य जलवाहिनी फुटली. त्यानंतर नळाला पाणीच आले नाही. अचानक ही घटना घडल्यामुळे अनेकांकडील पाणी संपले. नळाला पाणी येणार नाही हे नागरिकांना त्याच दिवशी उशिरा रात्री कळाले. तत्पूर्वी, बहुतेकांनी गरजेपुरते पाणी भरून ठेवले होते. तर काहींना नाईलाजाने शेजाऱ्यांकडून बोअरचे पाणी घ्यावे लागले, तर कोणी विहिरींवर धाव घेतली. मात्र, बहुतेकजण हे पाण्याच्या कॅन खरेदी करण्यास प्राधान्य देत आहेत. त्यामुळे शहरात दिवसभर कॅन विक्रेत्यांच्या गाड्या फिरत असल्याचे दृश्य होते.

तीन दिवसांपासून पाण्याच्या कॅनची मागणी दुपटीने वाढली
शहरात मुख्य जलवाहिनी फुटल्याने गुरुवारी सायंकाळपासून नळाला पाणी नाही. परिणामी नागरिकांकडे साठवलेले पाणी संपले. त्यामुळे गेल्या तीन दिवसांपासून पाण्याच्या कॅनला दुपटीने मागणी वाढली आहे.
-राजू परिहार, पाण्याच्या कॅन विक्रेता.

महापालिकेकडून शहरातील ६० कॅन विक्रेत्यांनी घेतला परवाना
मनपाकडून शहरात थंड पाण्याच्या कॅन पोहोचवणाऱ्या ६० विक्रेत्यांनी परवाना घेतला आहे. उर्वरित विक्रेत्यांकडे परवाना नाही. ज्यावेळी ते परवाना घेण्यास येतात त्यावेळी २०१६ पासून त्यांच्याकडून दंड वसूल करतो.
-उदयसिंग चव्हाण, अधीक्षक, बाजार व परवाना.

नळांना पाणी नाही; नाइलाजाने कॅनवर कसेबसे भागवावे लागते
तीन दिवसांपासून नळाला पाणी नाही. घरातील पाणी संपले आहे. पिण्यासोबतच स्वयंपाकासाठी पाण्याची आवश्यकता असते. त्यामुळे नाइलाजाने ३० रुपये खर्चून पाण्याची कॅन खरेदी करण्याशिवाय पर्याय नाही.
-वैशाली आसलकर, गृहिणी.

बातम्या आणखी आहेत...