आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करापोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने नागपुरी गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीतील ताजनगर स्थित एका गोदामात धाड टाकून कत्तलीसाठी आणलेल्या तब्बल १६३ गुरांची सुटका केली. पोलिसांनी या कारवाईत ११ जणांना ताब्यात घेतले आहे. याचवेळी एक जण पसार झाला आहे. शुक्रवारी (दि. ११) ही कारवाई करण्यात आली आहे. पोलिसांच्या कारवाईमुळे या सर्व गुरांना जीवदान मिळाले आहे.
नागपूरी गेट पोलिस ठाण्याच्या हद्दीतील ताजनगरातील एका मोकळ्या जागेत असणाऱ्या टीन शेडमधील गोदामात दोन वाहनांद्वारे मोठ्या प्रमाणात गुरे आणण्यात आल्याची माहिती विशेष पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे विशेष पथकातील एपीआय नायकवाडे, दीपक श्रीवास, सुरज चव्हाण, रोशन वऱ्हाडे, लखन कुशराज यांनी
धाड टाकली असता, तेथे मोठ्या प्रमाणात गोवंश आणले असून त्यांचा वापर कत्तलीसाठी होणार असल्याचे लक्षात आले. त्यामुळे पोलिसांनी या ठिकाणी असलेल्या १६३ गुरांची सुटका केली. तसेच या ठिकाणाहून फकीर मोहम्मद अब्दुल रशीद (२७,रा. लालखडी), फुरकान अहेमद शेख गुलाब (२३, रा. समदनगर), अब्दुल अझहर अब्दुल नजीर (२८, रा. बिसमिल्लानगर), जावेद शहा मंदू शहा (१९, रा. अकबरनगर), शेख सोहेल शेख सुहान (२९, रा. छायानगर), मोहम्मद फरिद अब्दुल गफ्फार (४४, रा. गवळीपुरा), अश्फाक अहेमद अब्दुल मुनाफ (५०, रा. हबीबनगर), साजीद अहेमद शब्बीर कुरेशी (३२, रा. छायानगर), अब्दुल जफर अब्दुल शकील (२८, रा. अलीमनगर), अब्दुल फईम अब्दुल खलील (४३, रा. पूर्णानगर) आणि मकसूद अहेमद अब्दुल जलील (४४,रा. अन्सारनगर) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर गोदाम मालक शेख जाकीर शेख बब्बू (५०, रा. ताजनगर क्रमांक २) हा पसार झाला आहे. दरम्यान विशेष पथकाची धाड झाल्याबाबत माहिती मिळताच नागपुरी गेटचे ठाणेदार पुंडलिक मेश्राम व त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले होते.
२१ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल जप्त
पोलिसांनी घटनास्थळावरून १६३ गोवंश ताब्यात घेतले. तसेच गुरांच्या वाहतुकीसाठी वापरलेले दोन मालवाहू वाहने सुद्धा जप्त केली. असा एकुण २१ लाख ७१ हजारांचा मुद्देमाल पोलिसांकडून जप्त करण्यात आला. दरम्यान, ही गुरं कोठून आली, कोणी आणली, ती शहरात पोहोचली कशी, याबाबत सखोल तपास करण्याच्या सूचना वरिष्ठांनी विशेष पथकाला दिल्या आहेत.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.