आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पीक विमा:पीक विमा परताव्यावरून आ. कडू यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

खरीप हंगामात जिल्ह्यात अतिवृष्टी झाली आणि सर्वच भागात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. असे असतानाही कृषी पीक विमा काढलेल्या शेतकऱ्यांना पीक विमा कंपनीकडून परतावा देताना तफावत असल्याचे ‘प्रहार’चे म्हणणे आहे. या मुद्दयावरुन ‘प्रहार’ने गुरूवारी (दि. १५) कृषी विभागाच्या कार्यालयात ठिया दिला होता. दरम्यान, याच मुद्दयावर आमदार बच्चू कडू यांनी गुरूवारी सायंकाळीच येथील विश्रामगृहात कृषी अधिकारी, पीक विमा कंपनीसोबत बैठक घेतली.

पीक विम्याच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांच्या तोंडाला पीक विमा कंपनी पाने पुसत असल्याचा आरोप ‘प्रहार’ने केला आहे. जिल्ह्यात काही ठिकाणी शेजारी शेत असलेल्या दोन शेतकऱ्यांना पीक विम्याचा परतावा देताना रकमेत तफावत आहे. तर काही शेतकऱ्यांना दोनशे, तीनशे अशी अल्प रक्कम मिळाली आहे. पीक उभे असताना २५ टक्के रक्कम तातडीने शेतकऱ्यांना मिळायला पाहिजे होती. मात्र. ती दिली नाही, असाही आरोप ‘प्रहार’ने केला. या सर्व बाबींवर ‘प्रहार’ने जिल्हा कृषी अधीक्षक यांच्या कार्यालयात ठिय्या आंदोलन केले होते.

यावेळी ‘प्रहार’चे संजय देशमुख व शेतकरी कार्यालयात पोहोचले हाेते. त्याच अनुषंगाने माजी मंत्री आमदार बच्चू कडू यांनी तातडीची बैठक बोलावून पीक विमा कंपनीच्या राज्यस्तरीय अधिकाऱ्यांना धारेवर धरले. तसेच महाराष्ट्र शासनाचे कृषी सचिव यांना देखील पीक विमा कंपनीच्या भोंगळ कारभाराबद्दल अवगत केले आणि सर्व पात्र शेतकऱ्यांना पीक विमा रक्कम त्वरित देण्याबाबत सूचित केले. आगामी आठ दिवसात शेतकऱ्यांना जर न्याय मिळाला नाही तर मुंबईत येऊन संबंधित अधिकाऱ्यांना आमच्या पद्धतीने जाब विचारु, असा इशारा आमदार कडू यांनी दिला. यावेळी प्रहार शेतकरी संघटनेचे मंगेश देशमुख, संजय देशमुख, प्रवीण हेंडवे, बंटी रामटेके, योगेश लोखंडे, रणजित खाडे, योगेश भुसारी, अंकुश गायकवाड, कपिल उमप, रोशन देशमुख, प्रवीण केने, देवानंद भोंडे, शरद खारोडे, सुरेंद्र भिवगडे, नरेंद्र काकडे, भूषण गाढे, साहेबराव फटींग, सुरज कुर्जेकर, पंकज चौधरी, विजू ढोले, विजय डोंगरे यांची उपस्थित होती. तसेच जिल्हा कृषी अधीक्षक अनिल खर्चान यांचीही बैठकीला उपस्थिती होती.

बातम्या आणखी आहेत...