आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अखिल भारतीय महिला हॉकी स्पर्धा:अमरावतीत 17 जूनपासून देशातील महिलांचे 12 अग्रणी हॉकी संघ जेतेपदासाठी लढत देणार

अमरावती16 दिवसांपूर्वी
 • कॉपी लिंक

विदर्भात प्रथमच 17 ते 19 जून या कालावधीत जीसीआय अमरावती गोल्डन व अमरावती जिल्हा महिला वुमेन्स हाॅकी अकादमी, क्रीडा उपसंचालक कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने मेजर ध्यानचंद चषक अखिल भारतीय महिला हाॅकी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून या स्पर्धेत देशातील अग्रणी 12 महिला संघ जेतेपदासाठी झुंजणार आहेत. ही स्पर्धा बाद पद्धतीने होणार असल्याने प्रत्येकच सामना चुरशीचा राहणार आहे.

पं.जवाहरलाल नेहरू जिल्हा स्टेडियमवर उद्घाटन व अंतिम सामना होईल. यासोबतच शहरातील डेप्युटी ग्राऊंड व एचव्हीपीएम येथेही सामने होतील. या स्पर्धेच्या निमित्ताने माजी ऑलिम्पियन अर्जुन पुरस्कार विजेते अशोक ध्यानचंद, अर्जुन पुरस्कार प्राप्त मार्विन फर्नांडीस, माजी गोलरक्षक मीर रंजन नेगी, सैय्यद जलालुद्दीन, माजी ऑलिम्पियन निता डोंगरे असे दिग्गज खेळाडू व इंदूर खंडपीठाचे न्या. अनिल वर्मा उपस्थित राहतील.

प्रत्येक संघात 18 खेळाडू, एक प्रशिक्षक आणि एक व्यवस्थापक असे 20 सदस्य राहतील. महिला खेळाडूंच्या राहण्याची व्यवस्था जिल्हा क्रीडा संकुलातील वसतीगृहात तर संघातील पुरुष अधिकाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था इतरत्र केली जाणार आहे. या स्पर्धेत हाॅकी इंडियाचे पंच व संचालक डॅनी केनीही उपस्थित राहतील.

अशी माहिती पत्रपरिषदेत क्रीडा उपसंचालक विजय संतान, डाॅ. तुषार झंवर, नम्रता पावडे, अॅड. अपर्णा ठाकरे, अमोल ठाकरे, प्रियंका लुंगे, सारिका कोकाटे, इमाम, संध्या किल्लेकर, सुरेखा दुबे, अर्चना बारबुद्धे, अॅड. शोएब, शम्स परवेझ, इमरान अथर अली, सलीम मीरावाले, रणजीत पावडे, अॅथलेटिक्स प्रशिक्षक अतुल पाटील उपस्थित होते.

सामन्यातील पराभूत संघालाही मिळणार 3 हजार

स्पर्धेतील विजेत्या संघाला 51 हजार रु. व चषक, उपविजेत्या संघाला 41 हजार रु. व चषक आणि तृतीय स्थानावरील संघाला 31 हजार रु. व चषक प्रदान केला जाईल. यासह उत्कृष्ट गोलरक्षक, सर्वाधिक गोल करणारी खेळाडू, स्पर्धेतील सर्वोत्तम खेळाडू, शिस्तीने वागणारी खेळाडू असे सांघिक आण वैयक्तिक पुरस्कार दिले जातील. यासोबतच प्रत्येक सामन्यातील विजयी संघाला 5 तर पराभूत संघाला 3 हजार रु. दिले जातील.

12 संघ असे

 1. कपुरथला, पंजाब,
 2. पाटणा, बिहार,
 3. कोलकाता, पं.बंगाल
 4. भिलाई स्टील प्लॅन्ट, दुर्ग छत्तीसगढ
 5. भिलवाडा, राजस्थान
 6. भारतीय क्रीडा प्राधिकरण (साई) मुंबई
 7. पुणे (महाराष्ट्र)
 8. कोल्हापूर (महाराष्ट्र)
 9. झांसी,उत्तर प्रदेश
 10. एम.पी.अकादमी, ग्वाल्हेर
 11. मध्य प्रदेश, नागपूर (महाराष्ट्र)
 12. अमरावती, महाराष्ट्र
बातम्या आणखी आहेत...