आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामोबाइलद्वारे लोकांना लिंक देऊन आयपीएलमधील क्रिकेट सामन्यांवर सट्टा खेळणाऱ्या एका सट्टेबाजास पोलिस आयुक्तांच्या विशेष पथकाने अटक केली. त्याच्याकडून ५५ हजारांचा मोबाइल जप्त करण्यात आला. ही कारवाई मंगळवार, ११ एप्रिल रोजी रात्री ९.४० वाजता साईनगर परिसरातील यशवंत लॉनसमोर करण्यात आली. हर्षद दिलीपकुमार जयस्वाल (२९, रा. गौरी अपार्टमेंट, अकोली मार्ग) असे अटक करण्यात आलेल्या सट्टेबाजाचे नाव आहे. साईनगरातील यशवंत लॉनसमोर हर्षद जयस्वाल हा मुंबई इंडियन्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्स या संघात सुरू असलेल्या सामन्यावर मोबाइलद्वारे लोकांना लिंक देऊन खायवाडी व लागवाडी करत होता. याबाबत विशेष पथकाला माहिती मिळाली.
या माहितीच्या आधारावर विशेष पथकाने धाड टाकली. यावेळी हर्षद हा मोबाइलमधील गुगल क्रोममध्ये भोले एक्सएच नामक बेकायदेशीर सॉफ्टवेअरद्वारे क्रिकेट सामन्यावर बेटिंग करताना आढळून आला. चौकशीत त्याने सदर ॲप योगेश साहू रा. छांगाणीनगर याच्याकडून घेतले असून, दोघांची सदर व्यवहारामध्ये भागीदारी असल्याचे सांगितले. त्यानुसार पथकाने योगेश साहूचा शोध घेतला. परंतु, त्याचा पत्ता लागला नाही. पोलिसांनी हर्षदकडून ५५ हजार रुपयांचा मोबाइल जप्त करून त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
या कारवाई विशेष पथकातील पोलिस उपनिरीक्षक गजानन राजमलू, सुनील लासूरकर, जहीर शेख, अतुल संभे, राहुल ढेंगेकर, विनोद काटकर, सागर ठाकरे आदींनी केली. दरम्यान, गेल्या तीन दिवसांपासून आयपीएल क्रिकेट सट्ट्यांवर बेटींग लावण्याच्या घटनांमध्ये शहरातील ही तिसरी घटना आहे. पोलिसांनी आपल्या कारवाईचे सत्र सुरु केले आहे तरी मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारे ऑनलाइन सट्टा सुरु आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.