आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

गणेशोत्सव:गणेशोत्सवामुळे बाजाराला झळाळी; दोन वर्षांतील मरगळ सरली

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

बाप्पाचे आगमन यंदा बाजारात चैतन्य निर्माण करणारे आहे. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांत जी मरगळ आली होती ती यंदा दूर झाली आहे. शाडू माती, रंग, सजावटीचे साहित्य महागल्यामुळे यंदा श्री गणेशमूर्तींच्या किंमतीत २० ते ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. उंचीवरील मर्यादा हटल्याने मूर्तिकारांसाठी पुन्हा सुगीचे दिवस आले आहेत.

गणेश मंडळांपासून ते घरी गणरायांची स्थापना करणारे भाविक मनापासून खर्च करत आहेत. मूर्तिकार मूर्ती विक्रेते, ढोल ताशे पथक, मखर विक्रेते, फुले, फळे, दुर्वा, पूजेचे साहित्य विक्रेत्यांकडे मोठ्या प्रमाणात गर्दी असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसत आहे. गणेशोत्सव मनाप्रमाणे साजरा करता येत असल्याने भाविक मनापासून खर्च करत आहेत. १० रुपयांना मिळणारा हार सध्या २५ रुपयात विकला जात आहे.

दीड ते २ फुटांपर्यंत मूर्ती १ हजार ते १५०० रुपयांपर्यंत आहेत. वाद्यासाठी १५ ते २१ हजार रुपये मानधन प्रत्येक तासाला आकारले जाणार आहे. मोठ्या गणेश मूर्तींची किंमत आकार व सजावटीनुसार १० हजारांपासून ते १ लाख रुपयांच्याही वर आहे. त्यामुळे बाप्पांचे आगमन यंदा शुभच नव्हे तर लाभही देणारे ठरणार आहे.

दीडपट ते दुप्पट फायदा
मूर्तिकार, विक्रेत्यांना यंदा दीड ते दोन पट फायदा होणार आहे. ग्राहकही समाधानी दिसत आहेत. त्यामुळे सर्वच समाधानी आहेत. -जयंत वडतकर, मूर्ती विक्रेते व पर्यावरण प्रेमी.

यंदा मातीच्या मूर्तींची मागणी वाढली
गेल्या वर्षी ५०० रु. ने मिळणारी मूर्ती यंदा ८०० ते १००० रुपयांपर्यंत मिळत आहे. विशेषत: मातीच्या मूर्तींना यंदा मागणी वाढली आहे. -नीलेश कंचनपुरे, मूती विक्रेते व पर्यावरण प्रेमी.

भाद्रपद मास, शुक्ल पक्षे , चतुर्थी तिथी, प्रारंभ : मंगळवार ३० ऑगस्ट दुपारी ३ वाजून ३४ मिनिटे. भाद्र शुक्ल चतुर्थी तिथी समाप्ती : बुधवार ३१ ऑगस्ट दुपारी ३ वाजून २३ मिनिटे. बुधवार ३१ ऑगस्ट गणपती स्थापना करण्यासाठी शुभ मुहूर्त चौघडिया. सकाळी ६ वाजून २५ मिनिटे ते ७ वाजून ५९ मिनिटापर्यंत., सकाळी ७ वाजून ५९ मिनिटे ते ९ वाजून ३३ मिनिटापर्यंत. जर या मुहूर्तावर स्थापना होऊ शकली नाही तर शुभ चौघडिया ११ वाजून ०७ मिनिटे ते दुपारी १२ वाजून ४१ मिनिटे या मुहूर्तावर हे शुभ काम तुम्ही संपन्न करू शकतात. परंतु, यात दुपारी १२ वाजेपासून ते १ वाजून ३० मिनिटे या काळात राहूकाळ राहील त्यामुळे या वेळेत स्थापना न करणे जास्त चांगले ठरणार आहे.

बातम्या आणखी आहेत...