आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

देखभालीकडे दुर्लक्ष:रस्ता दुभाजक बनले कचराकुंड्या; झुडुपे, फांद्यांमुळे अपघाताचाही धोका

रवींद्र लाखोडे | अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती शहरातील बहुतांश रस्ता दुभाजकांकडे प्रशासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरून ये-जा करताना कधीकाळी आल्हाददायक वातावरणाचा अनुभव देणारे हे दुभाजक आता नागरिकांच्याच जीवावर उठू लागलेत. काही ठिकाणी या दुभाजकांवर काटेरी झुडपे उगवली, तर काही ठिकाणी कचराकुंडीसारखा त्याचा वापर होत असल्याचे दिसून आले.

दुभाजकात लावलेली फुलांची झाडे गायब झाली, बऱ्याच दुभाजकांमधील गवतही वाळले. काही दुभाजकांच्या काठांवर वाहनांचा आघात झाल्याने ते फुटून त्यातील दगड बाहेर पडलेत. परंतु विखुरलेले हे दगड अद्याप शाबूत केले गेले नाही. किंवा इतर ठिकाणी लोंबकळलेल्या झाडांच्या फांद्याही छाटल्या गेल्या नाहीत. विशेष म्हणजे जिल्ह्याची सर्वोच्च यंत्रणा असलेल्या जिल्हा कचेरी आणि जिल्हा कोर्टासमोरील दुभाजकाचेही हेच विदारक वास्तव आहे. सदर दुभाजकांच्या देखरेखीची जबाबदारी रस्ता ज्या कार्यालयाने बांधला, त्यांच्याकडेे आहे. शहरातील प्रमुख रस्ते मनपाचे असून काही सार्वजनिक बांधकाम विभागाचे आहेत. परंतु दोन्ही यंत्रणांचे त्याकडे दुर्लक्ष झाल. त्यासंदर्भात ‘दिव्य मराठी’ने केलेला हा ग्राउंड रिपोर्ट.

जिल्हा कचेरी समोरच्या दुभाजकावरचे गवत वाळले
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या मुख्य प्रवेशद्वारा समोरून थेट सुंदरलाल पटवा चौकात पोहाेचणाऱ्या रस्त्यावरील दुभाजक म्हणजे वाळलेल्या गवताचा थर असा आहे. जिल्ह्याची अत्यंत महत्त्वाची कार्यालये या दुभाजकाच्या दुतर्फा वसली आहेत. यामध्ये जिल्हा न्यायालय, जिल्हा परिषद, उपवन संरक्षकांचे कार्यालय, एनसीसीचे कर्नल ऑफिससह काही उच्चपदस्थ अधिकाऱ्यांची निवासस्थाने आहेत. तरी या रस्त्यावरील दुभाजकाकडे यंत्रणेचे दुर्लक्ष झाले, हे मात्र वास्तव आहे.

काँग्रेसनगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर लोंबकळतात फांद्या
राजकमल चौकातून काँग्रेस नगरकडे जाताना रेल्वे पुल संपल्यावर अत्यंत दणकट असा सिमेंट काँक्रिटचा रस्ता सुरू होतो. हमालपुरा, रुक्मिणीनगर, श्यामनगर अशा प्रमुख चौकातून जाणाऱ्या या मार्गावरील दुभाजकात हिरवाई दाटून भरली आहे. परंतु तिचीही देखरेख नाही. मनपाच्या अखत्यारीतील हा रस्ता आहे. मात्र त्यावर वाढलेल्या झाडांच्या फांद्या चक्क रस्त्यावर लोंबकळत असतानाही त्या छाटल्या गेल्या नाहीत. फांद्या वाढल्यामुळे वळणही दिसून येत नाही.

दुभाजकात कचरा टाकणाऱ्यांकडे दुर्लक्ष
रेल्वे स्टेशन चौकातून मध्यवर्ती बसस्थानकाकडे जातानाच्या रस्त्यावरील दुभाजकाला इतर अडथळ्यांपासून वाचवण्यासाठी जाळीचे कुंपण घातले. मात्र त्याचा दुरुपयोग करताना नागरिक जराही अडखळत नाहीत. जाळी म्हणजे जणू कचरा कुंडीच आहे की काय या अविर्भावात रस्ता दुभाजकावर कचरा ओतला जातो. मुळात देखरेख करणारे किंवा त्यावर पाळत ठेवणारे कुणीच नसल्यामुळे दुभाजकाची अशी दुरवस्था झाली आहे.

अर्जुननगर परिसरातील दुभाजकांवरची झाडे बनली ‘निष्पर्ण’
अमरावतीहून नागपूरला जाताना शहरातील शेवटचा थांबा अर्जुननगर येतो. त्याच्या थोडे पुढे रहाटगाव आहे. सीमा विस्तारामुळे आता तेही गाव अमरावती मनपा क्षेत्रात समाविष्ट झाले आहे. परंतु या दुभाजकाकडेही यंत्रणेचे लक्ष नाही. रस्ता दुभाजकावर मोठ्या हौसेने आणि तेही सरकारी तिजोरीतून मोठी रक्कम खर्च करून झाडे लावण्यात आली. मात्र निगा न राखल्यामुळे झाडे वाळली असून ती निष्पर्ण झाली आहेत.

बातम्या आणखी आहेत...