आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अनारोग्याचा ऋतू:कंटेनरअभावी शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग, कारवाईच्या सूचनांकडेही नागरिकांचा कानाडोळा

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहर स्वच्छ व सुंदर करण्याचा ध्यास घेतलेल्या महानगर पालिकेने शहरात ठिकठिकाणी कचऱ्याचे कंटेनर ठेवले होते. परंतु, सध्या कंटेनर शोधूनही सापडणार नाहीत, अशी स्थिती आहे. ते नेमके कुठे गायब झाले तेच कळायला मार्ग नाही. शिल्लक राहिले आहेत ते केवळ सूचना फलक. ‘कचरा कंटेनरमध्ये टाकावा. इतरत्र कचरा टाकल्यास दंडात्मक कारवाई करण्यात येईल’, अशी सूचना त्यावर लिहिली आहे. कंटेनरच नसताना त्या फलकांचा कवडीचाही उपयोग नाही. मात्र, कचरा कंटेनर नसल्याने शहरवासीयांवर घरातील कचरा रस्त्यावर टाकण्याची वेळ आली आहे. परिणामी शहरातील बहुतेक प्रभाग, वाॅर्ड, गल्लीत नजर टाकली असता कचऱ्याचे ढिगारे पडून असल्याचे आणि त्यामुळे आरोग्यदायी ऋतूत नागरिकांचे स्वास्थ्य धोक्यात आले आहे.

गल्लोगल्ली येणाऱ्या कचऱ्याच्या गाड्याही बहुतेक भागात १० ते १५ दिवसांच्या अंतराने येत असल्याने कचऱ्याचे ढिगारे रस्त्यावर साचले असून, ते परिसरात दुर्गंधी पसरवत आहेत. साहित्य व सांस्कृतिक नगरी म्हणून ओळख असलेल्या अमरावती शहरात कचऱ्याच्या ढिगाऱ्यांचे किळसवाणे दृश्य पहावयास मिळत आहे.नागरिकांच्या घरातून निघणाऱ्या कचऱ्याची उचल करण्यासाठी मनपाद्वारे घंटागाड्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, या गाड्याही शहरातील बहुतेक भागांमध्ये १५-१५ दिवस पोहोचत नसल्याने नागरिकांना घरातील कचरा कंटेनरअभावी रस्त्यावर टाकण्याची वेळ आली आहे. काही नागरिक हा कचरा जाळतात. दुर्गंधी व धूर यामुळे वातावरण दूषित होत असून, नागरिकांच्या आरोग्याच्या समस्या निर्माण झाल्या आहेत.

घरातून बाहेर पडताच दृष्टीस पडतो कचरा : बहुतेक भागात नागरिक कचरा जाळत असल्याने प्रदूषण वाढत आहे, तर दुसरीकडे कचऱ्याची समस्या डोके वर काढत आहे. शहरातील अनेक रस्ते कचऱ्याचे हब बनू पहात आहेत. रस्त्याच्या बाजूने, मोकळ्या जागेत कचऱ्याचे ढीग जमा झाले आहेत. हाच कचरा रस्त्यालगतच्या नालीत साचून त्या तुंबत आहेत. सकाळी घरातून बाहेर पडल्यानंतर कचऱ्याचे दर्शन होत असल्याचे विदारक दृश्य शहरात ठिकठिकाणी पहायला मिळते.

रस्त्यांवर कचऱ्याचे साम्राज्य; नागरिकांचे आरोग्य धोक्यात : यापूर्वी कंटेनरमध्ये कचरा व्यवस्थित पडत होता. सध्या कचरा हा रस्त्यावर अस्ताव्यस्त पडून राहतो. किंबहुना टाकला जातो. भटकी जनावरे तो कचरा विस्कटून टाकतात. त्यामुळे रस्त्यावर कचऱ्याचे साम्राज्य पसरले आहे. दिवसेंदिवस शहरातील कचऱ्याचा प्रश्न गंभीर होत चालला असून, नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

रस्त्यावर कचरा टाकल्याने तयार झाले उकिरडे शहरात विविध भागात फेरफटका मारताना कंटेनरअभावी नागरिकांनी रस्त्यावर कचरा टाकल्याने ठिकठिकाणी उकिरडे तयार झाले आहेत. कचरा फेकणाऱ्यावर दंडात्मक कारवाई होवू शकते, असा फलक लिहूनदेखील नागरिक त्याकडे कानाडोळा करताना दिसतात. कारण तेथे फलक तर आहे, परंतु कंटनेरच गायब आहेत.

अनियमित घंटागाड्यांमुळे घरातच सडतो कचरा आमच्या मागच्या गल्लीत आठवड्यातून दोन वेळा घंटागाडी येते. परंतु, काही वेळी ती आमच्या परिसरात ८ ते १० दिवसांनंतर येते. त्यामुळे कचऱ्याला दुर्गंधी सुटते. त्याचा बऱ्याचदा आरोग्याला त्रास होतो. परिसरात कचऱ्याचे कंटनेर नसल्याने कचरा कुठे टाकायचा, असा प्रश्न पडतो. -विष्णूपंत निंबर्ते, इंद्रप्रस्थ कॉलनी, नागरिक

कचरा कंटेनर पूर्वी होते, आता दिसेनासे झालेत पार्वतीनगर परिसरात कचऱ्याचे एक कंटेनर होते. मात्र मागील काही महिन्यांपासून ते गायब आहे. कचरा संकलन करणारी गाडीही कित्येक दिवस येत नसल्याने घरातील जमा झालेला कचरा टाकायचा कुठे? नाईलाजास्तव तो कचरा जाळावा लागतो. कचऱ्याचे एक तरी कंटेनर परिसरात असणे आवश्यक आहे. -श्याम सोळंकी, नागरिक, पार्वती नगर, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...