आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:खुर्चीऐवजी सतरंजीवर बसून केले राजपत्रित अधिकाऱ्यांनी कामकाज; सामाजिक न्याय विभागाच्या अधिकाऱ्यांचे अभिनव आंदोलन

अमरावतीएका वर्षापूर्वी
  • कॉपी लिंक

सामाजिक न्याय विभागातील अधिकाऱ्यांच्या प्रलंबित मागण्यांकरिता गुरुवारी अधिकाऱ्यांनी खुर्चीवर न बसता चक्क खाली सतरंजीवर बसून, दिवसभर कामकाज केले. या आंदोलनामुळे येथे येणाऱ्यांचे लक्ष वेधल्या गेले. आंदोलनात सहभागी होत सहाय्यक आयुक्त माया केदार व जात पडताळणी समितीचे संशोधन अधिकारी दीपा हेरोळे यांनी सतरंजीवर खाली असून, कामकाज केले. तत्पूर्वी त्यांनी रोजगार हमी योजनेचे उपजिल्हाधिकारी यांना निवेदन सादर केले. सामाजिक न्याय विभागाच्या राजपत्रित अधिकारी संघटनेनेच्या वतीने राज्यभर हे अभिनव आंदोलन सुरू केले असून, दोन दिवस आंदोलन चालणार आहे.

सहाय्यक आयुक्तांच्या वेतनश्रेणीत वाढ करावी, सहआयुक्त व अतिरिक्त आयुक्त पदावर पदोन्नती द्यावी, सह आयुक्त समाज कल्याण व अतिरिक्त आयुक्त समाजकल्याण या १३ वरिष्ठ अधिकाऱ्यांपैकी केवळ एक पद भरले आहे. त्यामुळे प्रशासकीय कामकाज, जात पडताळणी समिती कामकाजावर विपरित परिणाम होत आहे.

पदोन्नती देऊन त्वरित रिक्त पदे भरावीत, नऊ प्रादेशिक उपायुक्त पदांचे श्रेणीवर्धन करून सह आयुक्त समाज कल्याण करावे, प्रति नियुक्तीला विरोध व चौकशी करावी, प्रलंबित गोपनीय अहवाल त्वरित लिहावेत आदी प्रलंबित मागण्यांकरिता संघटनेचा शासनस्तरावर पाठपुरावा सुरू आहे.त्याची पूर्तता झालेली नाही. त्यामुळे आंदोलन करण्याची पूर्वसूचना संदर्भाकित पत्रान्वये शासनाला पाठवली आहे परंतु या मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्याने गुरुवारी पहिल्या टप्प्यातील दोन दिवसीय सतरंजी बैठक आंदोलन सुरू करण्यात आले. या विभागातील राजपत्रित अधिकाऱ्यांनी खुर्चीवर न बसता सतरंजीवर बसून कामकाज केले. यानंतरही मागण्यांवर ठोस कार्यवाही न झाल्यास तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा यावेळी दिला.