आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांना आता चकरा मारायची नाही गरज:एका क्लिकवर मिळवा डिजिटल स्वाक्षरीसह ऑनलाइन सातबारा

अमरावती21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

जमिनीचा सातबारा मिळवण्यासाठी आता तलाठी कार्यालयात चकरा मारायची गरज उरली नाही. शासनाच्या महाभूलेख पोर्टलवर एका क्लिकवर डिजिटल स्वाक्षरीचा ऑनलाइन सातबारा उपलब्ध होत असल्याने शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे. मात्र, काही फेरफार रखडत असल्याने जवळपास साडेतीन हजार सातबारा मिळण्यास काहीसा विलंब लागत असल्याचे दिसून येते.

शेतकऱ्यांना विविध कामांसाठी जमिनीचा सातबारा आवश्यक असतो. महसूल यंत्रणेद्वारा हे उतारे देण्याचे काम तलाठ्यांना दिले आहे. मात्र, एकाच तलाठ्याकडे दोन-चार गावांचा कारभार असल्याने त्यांची भेट न होणे, तहसील कार्यालयातील बैठकी यासह अन्य कामांमुळे तलाठी सहज उपलब्ध होत नाहीत. त्यामुळे वारंवार तलाठी कार्यालयात चकरा माराव्या लागत होत्या. त्यानंतर तलाठी न मिळाल्यास त्याला शोधण्यासाठी पुन्हा हेलपाटे होते. मात्र, आता ऑनलाइन सुविधा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचा मानसिक त्रास वाचला आहे. आता शासनाने डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उपलब्ध केला आहे. तसेच शेतीसंबंधी महत्त्वाचे असणारे ४,४६,७३७ कृषक सातबारे ऑनलाइन झालेले आहेत. डिजिटल सातबाऱ्याची १०० टक्के प्रक्रिया जिल्ह्यात पूर्ण झालेली आहे. आता ऑनलाइन सातबारा उपलब्ध झाल्याने शेतकऱ्यांचा वेळ वाचत आहे. याशिवाय सात-बारा देण्यासाठी असलेला मानवी हस्तक्षेप बाद झाला व यामध्ये पारदर्शकता आलेली आहे.

कोठे काढणार ऑनलाइन सातबारा
डिजिटल सातबारा महाभूलेख, या संकेतस्थळावर ऑनलाइन मिळतो. आपले सरकार सेवा केंद्र किंवा तलाठी कार्यालयातही हा डिजिटल स्वाक्षरीचा सातबारा उपलब्ध आहे. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वेबसाइटवरही यासाठी लिंक दिली आहे.

ई-पीक पाहणीची ४८ तासांत परस्पर सातबारावर नोंद
शेतकरी स्वतः बांधावरून ई-पीक नोंद ॲपद्वारे करत आहेत. ही नोंद केल्यानंतर ऑटोमॅटिकपणे ४८ तासांत सातबारावर होते. त्यामुळे सातबारा डाटा साईनसाठी अटकण्याची शक्यता खूप कमी असल्याची माहिती महसूल विभागाने दिली.

संकेतस्थळावरून सहज उपलब्ध
जिल्ह्यात साधारणपणे सर्व सातबाराची ऑनलाइन नोंद झालेली अाहे. त्यामुळे डिजिटल स्वाक्षरीने हे सातबारा शेतकऱ्यांना संकेत स्थळावरून सहज उपलब्ध होतात.
- रणजित भोसले, उपजिल्हाधिकारी.

बातम्या आणखी आहेत...