आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आंदोलन:वरुड नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागात काँग्रेसचा घागर फोडो मोर्चा

शेंदुरजनाघाट2 महिन्यांपूर्वीलेखक: प्रतिनिधी
  • कॉपी लिंक
  • नियमित पाणीपुरवठ्याच्या मागणीसाठी वरुडवासीयांनी वेधले प्रशासनाचे लक्ष

वरुड शहरामध्ये गेल्या आठ ते दहा दिवसांपासून अनियमित पाणीपुरवठा सुरु झाला आहे. नागरिक ओरडू नये म्हणून काही दिवस आधी दवंडी देण्यात आली होती, की फक्त मोजके दिवस पाणीपुरवठा अनियमित राहील. परंतु अनेक दिवसांपासून पाणीच मिळाले नाही. त्याचा निषेध करत नियमित पाणी पुरवठ्याच्या मागणीसाठी वरुडवासीयांनी न.प. प्रशासकांच्या कार्यालयावर धडक देत घागर मोर्चा काढला.

मुख्याधिकारी उपलब्ध नसल्यामुळे नागरिकांनी यावेळी त्यांच्या दालनात ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर उपमुख्याधिकारी गौरव गाडगे यांना निवेदन देऊन त्यांच्यासमक्ष घागरी फोडण्यात आल्या. दरम्यान, जोडणीचा खर्च नागरिकांनी आधीच दिला असल्याने नव्या जोडणीसाठी त्यांना ६०० रुपये मागू नये, अशी मागणी यावेळी करण्यात आली. शिवाय मागण्या मान्य न झाल्यास भविष्यात यापेक्षाही तीव्र आंदोलन करण्यात येईल, अशी मागणी करण्यात आली.

वरुड नगरपालिका ही नेहमीच समस्येचे माहेरघर ठरली आहे. चुकीचे नियोजन आणि जनतेला वेठीस धरणारी फर्मानं अधून-मधून जारी केली जातात. बोगस मोटर पंप विकत घेऊन जनतेचा पैसा गिळंकृत करण्याचा विक्रम पालिकेने केला आहे. परंतु जनतेला पाणी देण्यासाठी मात्र कोणताही ठोस मुद्दा हातात घेतला नाही. नव्याने अस्तित्वात आलेली पाणीपुरवठा योजना सुरळीत कार्यान्वित व्हायला किमान दोन ते तीन वर्षे लागतील. पण योजना सुरु केली म्हणून पालिकेने जबाबदारी झटकून दिली आहे. सध्याचा पाणीपुरवठा विस्कळीत का झाला, याची माहिती घेतली असता कळले की जमालपुर पंप हाऊसचा विद्युत पुरवठा बंद होता. पण नागरिकांच्या मते विद्युत पुरवठा ८ ते १० दिवस बंद राहू शकत नाही. त्यामुळे हे निव्वळ नाटक असून नगरपालिका पळवाट काढत आहे. शिवाय बऱ्याच भागात नव्याने टाकण्यात आलेल्या मोठ्या गेजच्या पाइपलाइनमुळे जुनी पाइपलाइन रद्द करण्यात आली आहे.

त्यामुळे नव्या जोडणीसाठी प्रत्येकाला ६०० रुपये मागितले जात आहे. जुन्या ग्राहकांनी पैसे भरुनच जोडणी केली आहे मग नवी पाइपलाइन टाकण्यासाठी पुन्हा पैसे का द्यायचे, असा नागरिकांचा सवाल आहे. ही जबाबदारी कोणाची ? का म्हणून जनतेने भुर्दंड भरावा ? दरवर्षी पाणीपुरवठा बिलात होणारी वाढ कोणआसाठी व कशासाठी असते ? आदी प्रश्न यावेळी उपस्थित करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक धनंजय बोकडे, शहर अध्यक्ष राहुल चौधरी, युवक शहर अध्यक्ष बंटी रडके, महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सविताताइ काळे, महिला सेवादल अध्यक्षा रंजना मस्की, तालुका महिला उपाध्यक्ष शैलजा वानखडे, दुर्गा हरले, वसंत निकम, तालुका अल्पसंख्यांक सेल अध्यक्ष मकसूद पठाण, सतीश धोटे, शकिल शहा, सर्वेश ताथोडे, गजानन पडोळे, गोलु पेठे, शैलश ठाकरे आदी उपस्थित होते.

आठवडाभरात उपाययोजना केली जाणार
पाणी पुरवठ्यासंबंधी ज्या काही अडचणी असेल त्यावर येत्या आठ दिवसांत उपाय योजना केल्या जाईल. मी सध्या कार्यालयीन कामकाजामुळे मुंबईत आहो. परतल्यानंतर आंदोलनकर्त्यांशी चर्चा केली जाईल आणि समोरासमोर बसून नागरिकांच्या हिताच्या दृष्टीने योग्य तो निर्णय घेतला जाईल. -रवींद्र पाटील, मुख्याधिकारी, नगरपरिषद, वरुड.

बातम्या आणखी आहेत...