आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

काँग्रेस सर्वच ठिकाणी लढणार:अमरावती जिल्ह्यातील सर्वात मोठ्या कृऊबाससाठी घमासान; 18 जागांसाठी 212 जण मैदानात

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्याच्या मुख्यालयी असलेल्या अमरावती-भातकुली कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ सदस्यीय संचालक मंडळाची निवडणूक आगामी २८ एप्रिल रोजी होत आहे. आज, सोमवार, ३ एप्रिल हा उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस होता. त्यामुळे संचालक पदासाठी मैदानात उतरलेल्या उमेदवारांची एकूण संख्या निश्चित झाली असून ती २१२ वर पोचली आहे.

सहकार विभागाची ही निवडणूक म्हणायला राजकारणविरहित असली तरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या भविष्यातील निवडणुका लक्षात घेता त्यात सर्वच राजकीय पुढारी सहभागी होत आहेत. गेल्यावेळी ७५ टक्क्यांहून अधिक ठिकाणी सत्ता राखलेल्या काँग्रेसने यावेळी सर्वच ठिकाणी ‘सहकार पॅनल’ची घोषणा केली असून इतर समविचारी पक्ष-संघटनाही त्यात सहभागी होतील, असे म्हटले आहे. तर तिकडे खासदार नवनीत राणा व बडनेराचे आमदार रवि राणा यांनी माजी जि.प. सदस्य काँग्रेसचे प्रकाश साबळे यांना सोबत घेत शेतकरी पॅनलची घोषणा केली आहे. भाजपसह इतर पक्ष पुढाऱ्यांनी मात्र सावध भूमिका घेत विड्रालपर्यंत आमचे पॅनल ठरलेले असेल, असे म्हटले आहे. २० एप्रिल ही उमेदवारी मागे घेण्याची शेवटची तारीख आहे. त्यामुळे कोण कोणासोबत आणि कोणाच्या विरोधात दंड थोपटेल, हे येत्या पंधरवड्यात स्पष्ट होणार आहे.

जिल्ह्यात चिखलदरा वगळता इतर सर्व १३ तालुक्यांत कृऊबासची निवडणूक होत आहे. अमरावती एपीएमसीमध्ये भातकुली तालुका समाविष्ट करण्यात आल्याने जिल्ह्यात डझनभर ठिकाणी ही रणधुमाळी होत आहे. त्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी सर्व पदाधिकाऱ्यांवर योग्य ती जबाबदारी सोपविली असून अमरावती-भातकुली, मोर्शी व तिवसा या तीन ठिकाणी माजी पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर अंतिम निर्णय घेतील, असे म्हटले आहे. चांदूर बाजार आणि अचलपुर येथे जिल्हाध्यक्ष स्वत: निर्णायक भूमिकेत असतील. तर दर्यापुरात गजाननराव भारसाकळे, बाळासाहेब हिंगणीकर यांना सोबत घेऊन आमदार बळवंतराव वानखडे एपीएमसीचे नेतृत्व सांभाळतील. त्याचवेळी अंजनगाव सुर्जी येथे त्यांच्या सोबतीला जिल्हा बँकेचे अनंत साबळे व प्रमोद दाळू तेथील किल्ला लढवतील. वरुड एपीएमसीसाठी गिरीश कराळे आणि पंचायत समितीचे माजी सभापती विक्रम ठाकरे आणि धारणीत दयाराम काळे आणि महेंद्रसिंग गैलवार काँग्रेसच्या सहकार पॅनलची पताका उंचावतील. दरम्यान एपीएमसीचे माजी सभापती तथा राकाँचे जिल्हाध्यक्ष सुनील वऱ्हाडे, जिल्हा बँकेचे संचालक हरिभाऊ मोहोड, मनोज देशमुख व शिवसेनेच्या प्रिती बंडही सहकार पॅनलमध्येच आहेत.