आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराआकाशात उडणारे पक्षी बघितले की, मनुष्यालाही त्यांचा हेवा वाटतो. हवेत उडावेसे वाटते. मात्र, याच मनुष्याच्या चुकीमुळे अर्थात पतंग व नायलॉन मांजाने दोन घारींचे पंखच छाटले व त्यांचे आकाशाशी नातेच तोडून टाकले. या दोन्ही घारी तीन वर्षांपासून भरारी घेण्यास असमर्थ आहेत. त्यांना पुढील आयुष्य जमिनीवरच घालवावे लागणार आहे. हे दोन्ही पक्षी मनुष्याने अपंगत्व दिल्याने वन विभागाच्या वडाळी परिक्षेत्रातील बांबू उद्यानात प्राणी, पक्षी सांभाळ केंद्रातील पाच बाय पाचच्या पिंजऱ्यात उर्वरित आयुष्य कंठत आहेत.
या नर व मादी घारींचे वजन सुमारे १.५ किलो अन् वय १० वर्षांचे आहे. याच पिंजऱ्यात दोन महिन्यांपूर्वी जखमी झालेल्या आणखी दोन घारी आहेत. एकीचा एक पाय कापला गेला असून, दुसरीचे पंख काही प्रमाणात मांजाने छाटले गेल्याने उपचार सुरू आहेत. या दोन्ही घारी दोन ते तीन महिन्यात आकाशाला गवसणी घालण्यास सक्षम होतील, असा विश्वास उपचार करणारे डाॅ. स्वप्निल ठाकरे यांनी व्यक्त केला.
फेब्रुवारी २०१९ मध्ये शहरातील चपराशीपुरा व नवसारी भागात या दोन घारी मृत्यूशी झुंजत असताना आढळल्या. प्राणिमित्रांनी त्यांना उपचारासाठी आणले. त्यांना उपचारांसह व्यवस्थित अन्न दिल्यामुळे वाचल्या. परंतु, त्यांचे आयुष्यच निरर्थक झाले आहे. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन महल्ले, सहाय्यक पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. स्वप्निल ठाकरे, जीवनरक्षा बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष सागर मैदानकर, वनमजूर किशोर डहाके, व्यवस्थापक समीर वरघट, सौरभ धामणे, प्राणी व्यवस्थापक श्रीकांत गावंडे, गौरव वऱ्हाडे यांच्या मार्गदर्शनात घारींवर उपचार करण्यात आले.
रोज अर्धा किलो चिकन, मांस त्यांना खाद्य म्हणून देण्यात येत असून सकाळी एक पाव सायंकाळी एक पाव अशा पद्धतीने खाद्य दिले जाते. यासाठी वनविभागाला दररोजचा खर्च हा १५० ते १७० रुपये असल्याचे व्यवस्थापक सागर मैदानकर यांनी सांगितले.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.