आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

सोन्याच्या दरात वाढ:प्रतितोळा 55 हजार 800 रुपये भाव; दरवाढीमुळे सोने खरेदी करणाऱ्यांची संख्या मंदावली

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मागील आठ ते दहा दिवसांपासून सोन्याच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. त्यामुळे पंधरा दिवसांपुर्वी (24 कॅरेट) प्रति तोळा 50 हजारांच्या आसपास असलेले सोन्याचे दर शनिवारी (दि. 7) 55 हजार 800 रुपयांवर पोहचले. अचानक सुरू झालेल्या सोन्यातील दरवाढीमुळे सोने खरेदीदार ग्राहकांची संख्या चांगलीच मंदावली असल्याचे काही सुवर्णकारांनी ‘दिव्य मराठी’सोबत बोलताना सांगितले आहे.

सोन्या - चांदीकडे गुतंवणूक म्हणून बघणारा वर्ग मागील काही वर्षांपासून वाढतो आहे. सध्या सोन्याचे प्रतितोळ्याचे दर बाजारात 24 कॅरेट 55 हजार 800 रुपयांपर्यंत तर 22 कॅरेट 54 हजार 130 रुपयांपर्यंत पोहचले आहेत. वाढलेले सोन्याचे दर तसेच पौष महिन्यात विवाहाचे मुहूर्त नसल्यामुळे विवाह सोहळेसुध्दा अतिशय मोजकेच होत आहेत. त्यामुळे सोने विक्री थंडावली असल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले आहे. मात्र लग्नाव्यतिरीक्त मौंज, साखरपुडा, जन्माचा, लग्नाचा वाढदिवस आदी दिवसाला सोने खरेदी केली जाते. मात्र सध्या भाव वाढ झाल्यामुळे सोने खरेदीचे प्रमाण अतिशय कमी झालेले आहे.

मोडीचे प्रमाणही वाढले नाही

मागील आठ - दहा दिवसांपासून दरदिवशी तोड्यामागे पाचशे ते सातशे रुपयांची वाढ होत आहे. वाढलेले भाव लक्षात घेता ज्यांनी गुंतवणूक म्हणून सोने खरेदी केले आहे, ते सुध्दा मोड विक्रीसाठी येत नाही. कारण आणखी भाववाढ होईल, तसे झाल्यास आपले नुकसान होईल, असा विचार केला जातो. यावेळी मात्र गरजू व्यतिरीक्त कोणीही सोने खरेदी किंवा मोड विक्री करत नाही, असे व्यापाऱ्यांनी सांगितले आहे.

बाजारात ग्राहकांची गर्दी नाही

शेअर बाजारात आलेली मंदी, डॉलरचा घसरलेला भाव या दोन कारणांमुळे सोन्याचे भाव वाढले, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. कोरोना काळात म्हणजेच दोन वर्षांपुर्वी सोन्याचे भाव वाढले होते. मात्र कोरोना ओसरल्यानंतर जनजीवन पुर्वपदावर येताच सोन्याचे दर 50 हजारांच्या असपास आले होते. सुमारे दोन वर्ष सोन्याचे दर प्रतितोडा 48 हजार ते 51 हजारांच्या आसपास राहत होते मात्र मागील आठ ते दहा दिवसांपासून अचानकच दरदिवशी सोन्याच्या दरात वाढ होत आहे. आणखी किती दिवस भाववाढ होणार किंवा कधी कमी होणार, हे सांगता येत नाही. मात्र या भाववाढीमुळे सद्या सुवर्णापेढ्यांमध्ये सकाळपासून पेढ्यांबद होईपर्यंत शांतताच दिसत आहे.

- विवेक चुटके, सुवर्ण व्यावसायिक.

बातम्या आणखी आहेत...