आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विज्ञान प्रदर्शनीबाबत शासनाची घिसाडघाई:आठवडाभराची मुदत, मुख्याध्यापक संघाचा विरोध; फेरविचार करण्याची सूचना

अमरावती3 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

शालेय स्तरावरील विज्ञान प्रदर्शनीच्या आयोजनाबाबत शासनाने चालविलेली घिसाडघाई मुख्याध्यापक संघाने नाकारली असून याबाबत फेरविचार करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. एवढ्या कमी वेळात सदर प्रदर्शनीचे आयोजन करणे म्हणजे ती केवळ कागदावर केलेली कृती होईल, त्यामुळे मूळ उद्देशालाच हरताळ फासला जाणार असून विद्यार्थ्यांमध्ये ना वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविला जाईल ना त्यांच्यात विज्ञानाची गोडी निर्माण होईल, असा अभिप्राय दिला आहे.

अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघाने यासंदर्भात सर्व मुख्याध्यापकांशी चर्चा केली असून अवघ्या आठवडाभरात तयारी कशी करावी, या मुद्द्यावर त्या सर्वांचे एकमत झाले आहे. त्यानंतर त्यांनी शिक्षणाधिकारी यांच्यामार्फत शासनाला पत्र लिहून मूळ उद्देश साध्य केला जाईल, यासाठी सदर आयोजनाला पुरेसा वेळ दिला जावा, अशी मागणी केली आहे. मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष ललीत चौधरी यांच्यामते शासनाने गेल्या दोन-तीन दिवसांत सर्व शाळांशी पत्रव्यवहार केला असून आगामी 29 ऑगस्टच्या आंत विज्ञान प्रदर्शनी भरविण्याचे फर्मान सोडले आहे.

एक महिन्याचा कालावधी

यापूर्वी अशा विज्ञान प्रदर्शनीचे आयोजन करताना अमरावती जिल्हा मुख्याध्यापक संघ तथा जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळ यांची संयुक्त सभा घेतली जायची. शिक्षणाधिकारी यांच्या स्तरावर अशी सभा घेतल्यानंतरच तालुकानिहाय नियोजन केल्या जात असे. शिवाय ज्या शाळेकडे विज्ञान प्रदर्शनाची जबाबदारी दिली आहे, त्या शाळेला नियोजनासाठी साधारणता एक महिन्याचा कालावधी देण्यात येत असे. परंतु यावेळी असे काहीही न करता थेट 29 ऑगस्टच्या आत प्रदर्शनीचे आयोजन करा, असा संदेश देण्यात आला.

आयोजनाबाबत आदेश

त्यामुळे सदर विज्ञान प्रदर्शनीच्या आयोजन - नियोजनबाबत साशंकता निर्माण झाली असून अशा निकृष्ट नियोजनामुळे सदर विज्ञान प्रदर्शनीचे महत्त्व कमी झाल्याशिवाय राहणार नाही. केवळ कागदोपत्री विज्ञान प्रदर्शनी साजरी झाल्यास विद्यार्थ्यांमधील वैज्ञानिक दृष्टिकोन हा लोप पावल्याशिवाय राहणार नाही. त्यामुळे या गोंधळाची वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गंभीरतेने दखल घेऊन मुख्याध्यापकांना मार्गदर्शन करावे व त्यानंतरच विज्ञान प्रदर्शनीचे आयोजनाबाबत आदेश द्यावेत, असे संघाचे म्हणणे आहे.

सहभाग अत्यल्प

अशा अतिघाईने प्रदर्शनी आयोजित केल्यास विद्यार्थ्यांचा सहभाग हा अत्यल्प राहील. परिणामी विद्यार्थ्यांचा भ्रमनिरास होवून प्रदर्शनीबाबत निरुत्साह वाढण्याची भीती-वजा-शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सदर विज्ञान प्रदर्शन हे केवळ कागदावर न भरवता विद्यार्थ्यांच्या भरघोस उपस्थितीत तथा उत्साहात पार पडावे, यासाठी महिनाभराचा (सप्टेंबरपर्यंत) वेळ द्यावा. त्याच्या यशस्वीतेसाठी आम्ही कटिबद्ध आहोत, असेही संघाचे म्हणणे आहे.

बातम्या आणखी आहेत...