आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आरक्षण:जि.प. मध्ये 8 वर्षांनंतर पुन्हा येणार महिला राज; अध्यक्षपद सर्वसाधारण महिला संवर्गासाठी खुले

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

आठ वर्षांच्या खंडानंतर अमरावती जिल्हा परिषदेत पुन्हा ‘महिला राज’ येणार असून आगामी अध्यक्षपदी कोणत्याही प्रवर्गाच्या महिलेला संधी आहे. जिल्हा परिषदेच्या आगामी अध्यक्षपदाचे आरक्षण शुक्रवारी मंत्रालयात निश्चित करण्यात आले. त्यानुसार आगामी अध्यक्षपद हे सर्वसाधारण अर्थात खुल्या गटातील महिलांसाठी राखीव झाले आहे.

त्यामुळे येत्या निवडणुकीत विजयी होणाऱ्या कोणत्याही महिलेला या पदावर दावा सांगता येणार आहे. जिल्हा परिषदेत सध्या ५९ मतदारसंघ आहेत. वाढीव सात मतदारसंघांना शासनाने मान्यता नाकारली आहे. त्यामुळे राजकीयदृष्ट्या बलवान महिला उमेदवारासाठी सर्वच राजकीय पक्षांनी चाचपणी सुरु केली आहे. अमरावती जिल्हा परिषदेत सध्या प्रशासक राज सुरु आहे. येथील पदाधिकाऱ्यांचा कार्यकाळ गेल्या ८ मार्च रोजी संपुष्टात आला. मुदतपूर्व निवडणूक न झाल्यामुळे शासनाने जिल्हा परिषदेचे सीईओ अविश्यांत पंडा यांनाच प्रशासक म्हणून नियुक्त केले आहे.

अमरावती जिल्हा परिषदेत १९९७ साली उषाताई बेठेकर या पहिल्या महिला अध्यक्ष म्हणून विजयी झाल्या होत्या. त्यावेळचे अध्यक्षपद अनुसूचित जमातीसाठी (एसटी) राखीव होते. त्यानंतर १९९९ ते २००० या काळात विद्याताई वाटाणे आणि त्यानंतर महिनाभराच्या अंतराने २००० ते २००२ या काळात सुरेखाताई ठाकरे या पदावर विजयी झाल्या होत्या.

पुढे २००५ ते २००७ या काळात उषाताई उताणे आणि २०१२ ते २०१४ या काळात पुन्हा सुरेखाताई ठाकरे यांनी हे पद विभूषित केले आहे. त्यामुळे येत्या काळात या पदावर कोण विराजमान होईल, याचे उत्तर काळाच्या गर्भात दडले आहे. विशेष असे की, सुरेखाताई ठाकरे यांच्यावेळी अध्यक्षपद ओबीसी संवर्गातील महिलेसाठी तर उताणे यांच्यावेळी ते सर्वसाधारण संवर्गातील महिलेसाठी आरक्षित होते. उषाताई उताणे यांच्यानंतर म्ही संधी महिलेला प्राप्त होत आहे.

काँग्रेसची परंपरा
अमरावती जिल्हा परिषदेवर काँग्रेसचा प्रभाव राहिला आहे. राज्यात युतीचे सरकार असतानाही येथे शिवसेना, भाजपला संधी मिळाली नव्हती. आतापर्यंतच्या सर्व महिला अध्यक्ष या काँग्रेसच्याच तिकिटावर विजयी झाल्या आहेत. ही परंपरा कायम राखण्यासाठी तयारी सुरू केल्याचे काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले.

बातम्या आणखी आहेत...