आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निवडणूक:ग्रा. पं.साठी 75 टक्के मतदानाचा अंदाज; कारभाऱ्यांचा फैसला उद्या

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी पहिल्या ८ तासांत अर्थात दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ६२.४४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. अजून दोन तास शिल्लक असल्याने शेवटची आकडेवारी ७५ टक्क्यांवर पोहाेचणार असल्याचा अंदाज यंत्रणेने व्यक्त केला आहे. मतदानादरम्यान जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडला नसून इव्हीएममध्येही कोणताच तांत्रिक दोष निर्माण झाला नसल्याचे निवडणूक यंत्रणेचे म्हणणे आहे.

२५१ सरपंचांसाठी १,६५७ आणि सदस्यांच्या १६८४ जागांसाठी ३८५८ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. या सर्वांचे भाग्य आजच्या मतदानामुळ‌े इव्हीएममध्ये बंद झाले आहे. आगामी २० डिसेंबरच्या मतमोजणीअंती ते स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी ३ लाख ४८ हजार ६३१ मतदार मतदान करणार होते. त्यापैकी ७५ टक्के मतदार शेवटच्या क्षणापर्यंत आपला हक्क बजावतील, असा यंत्रणेचा अंदाज आहे. त्यासाठी जिल्हाभरात ८१७ मतदान केंद्र होते.

पाच गावांची निवडणूक अविरोध झाल्याने जिल्ह्यातील २५२ ग्रामपंचायतींसाठी रविवार, १८ डिसेंबरला मतदान घेण्यात आले. सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० अशी मतदानाची वेळ होती. ठरल्यानुसार सकाळी ७.३० च्या ठोक्याला मतदान सुरू झाले. थंडीचा काळ असल्याने पहिल्या दोन तासांत मतदानाचा वेग हळू होता.

निरीक्षक दुबेंकडून पाहणी
यवतमाळचे अप्पर जिल्हाधिकारी प्रमोदसिंह दुबे हे अमरावती जिल्ह्याच्या ग्रा. पं. निवडणुकीसाठी निरीक्षक आहेत. रविवारी दिवसभरात त्यांनी अनेक मतदान केंद्रांना भेट देऊन यंत्रणेची पाहणी केली. चांदूर रेल्वे तालुक्यातील टोंगलाबादच्या मतदान केंद्रापासून पाहणी दौरा प्रारंभ केला. त्यानंतर इतर काही केंद्रांना भेटी देऊन त्यांनी एकूण व्यवस्थेबाबत समाधान व्यक्त केले.

मंगळवारी सकाळी १० पासून मतमोजणीस प्रारंभ
निवडणुकीसाठी २८ नोव्हेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखलची प्रक्रिया सुरू झाली होती. ५ डिसेंबरला वैध, अवैध अर्जांची यादी घोषित केली गेली. ७ डिसेंबरपर्यंतचा वेळ उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी दिला होता. ठरलेल्या वेळापत्रकानुसार मंगळवार, २० डिसेंबरला सकाळी १० पासून त्या-त्या तहसील कार्यालयात मतमोजणी केली जाईल.

५ गावांत मतदान टळले
जिल्ह्यातील २५७ ग्रामपंचायतींपैकी चांदूर रेल्वे तालुक्यातील सावंगी संगम, नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील चिखली वैद्य, वरुड तालुक्यातील डवरगाव, मोर्शी तालुक्यातील बेलोना आणि दर्यापूर तालुक्यातील सांगवा बु. या पाच गावांतील सरपंच व सदस्यांची निवड बिनविरोध झाल्याने त्याठिकाणी प्रत्यक्ष निवडणूक टळली.

बातम्या आणखी आहेत...