आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पदवीधर मतदारसंघ निवडणूक:उद्यापासून उमेदवारी अर्ज, विभागीय आयुक्तांनी घेतला तयारीचा आढावा मतमोजणी केंद्राचीही पाहणी

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघ निवडणुकीसाठी उद्या, गुरुवार, ५ जानेवारीपासून उमेदवारी अर्ज दाखल केले जाणार आहेत. त्यादृष्टीने झालेल्या तयारीचा आढावा निवडणूक निर्णय अधिकारी या नात्याने विभागीय आयुक्त डॉ. दिलीप पांढरपट्टे यांनी आज, बुधवारी सायंकाळी घेतला. अधिकाऱ्यांची बैठक घेतल्यानंतर आयुक्तांनी मतमोजणी केंद्राचीही पाहणी केली.

मतदान व मतमोजणी प्रक्रिया सुरळीतपणे पार पाडण्याच्या दृष्टीने नोडल अधिकारी व जिल्हा यंत्रणांनी समन्वयपूर्वक कामे करावीत, असे आदेश या बैठकीत देण्यात आले. उपायुक्त संजय पवार, अजय लहाने, गजेंद्र बावणे, विजय भाकरे यांच्यासह अनेक अधिकारी या बैठकीला उपस्थित होते. डॉ. पांढरपट्टे म्हणाले की, नामांकन प्रक्रिया, मतदान साहित्य व्यवस्थापन, कर्मचारी प्रशिक्षण, मतदान व मतमोजणी केंद्रावरील व्यवस्था, मनुष्यबळ व्यवस्थापन, मतदार यादी आदी सर्व प्रक्रिया समन्वयाने दक्षतापूर्वक पार पाडावी. आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन व्हावे. माध्यम प्रमाणीकरण समितीबाबतही आवश्यक कार्यवाही करावी.

मतमोजणी केंद्र, स्ट्राँगरूम येथे चोख बंदोबस्त ठेवण्याचे निर्देशही त्यांनी दिले. त्याअनुषंगाने बैठकीनंतर विलासनगर येथील गोदामाची पाहणी केली. याठिकाणीच मतमोजणी केली जाणार आहे. त्याचप्रमाणे, पशुसंवर्धन कार्यालयाच्या परिसरात निर्माण होत असलेल्या ईव्हीएम गोडाऊनचीही पाहणी करण्यात आली. विभागीय स्तरावरील नोडल अधिका-यांच्या नेमणुकीचा आदेश निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. पांढरपट्टे यांनी निर्गमित केला. त्यानुसार मतदान व मतमोजणीबाबतच्या प्रशिक्षणाची जबाबदारी सहायक आयुक्त श्यामकांत म्हस्के, नायब तहसीलदार विजय सूर्यवंशी यांच्याकडे, तर चिन्हांकित मतदार यादी व टपाली मतपत्रिका, तसेच मतदान साहित्य व्यवस्थापनाची जबाबदारी जिल्हा निवडणूक अधिकारी व उपजिल्हा निवडणूक अधिका-यांकडे आहे.

यांच्याकडे नामांकनाची जबाबदारी

सदर निवडणुकीचे उमेदवारी अर्ज दाखल करुन घेण्याची प्रक्रिया उपायुक्त संजय पवार, तहसीलदार वैशाली पाथरे व नायब तहसीलदार राजेश चौधरी यांच्याकडे सोपविण्यात आली आहे.नामांकन प्रक्रियेसोबतच मतपत्रिका छपाई, टपाली मतपत्रिका आदी जबाबदारीही त्यांच्या खांद्यावर टाकण्यात आली आहे. त्याचवेळी आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था, पोलीस विभागाशी समन्वय, तक्रार नियंत्रण व निवारण कक्षाची जबाबदारी उपायुक्त अजय लहाने, संबंधित जिल्ह्यांचे अपर जिल्हाधिकारी, तहसीलदार निकिता जावरकर यांच्याकडे आहे.

अशा आहेत इतर समित्या

वाहतूक आराखडा, व्यवस्थेची जबाबदारी तहसीलदार निकीता जावरकर, नायब तहसीलदार प्रशांत अडसुळे व कमलेश वानखडे यांच्याकडे देण्यात आली आहे. मतमोजणी केंद्रावरील व्यवस्था, मतमोजणी प्रक्रिया आदींबाबतची जबाबदारी उपायुक्त गजेंद्र बावणे, श्यामकांत म्हस्के, सहायक आयुक्त विवेकानंद काळकर, तहसीलदार रवी महाले, विजय सूर्यवंशी, संतोष नटवे, सचिन पवार, पवन चेचरे, प्रतिक पावडे यांच्याकडे आहे. विविध परवानगी कक्षाबाबत उपायुक्त भाकरे यांच्याकडे जबाबदारी आहे.

बातम्या आणखी आहेत...