आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कोण मारणार बाजी?:दर्यापुरात मतमोजणीसाठी 9 टेबल, टप्प्याटप्प्याने जाहीर होणार ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यातील मुदत संपलेल्या 24 ग्रामपंचायतींसाठी रविवारी शांततेत मतदान झाले. शहरातील तहसील कार्यालयातील इमारतीच्या स्ट्रॉंगरूममध्ये चोख पोलिस बंदोबस्तात ईव्हीएम मतदान यंत्रे ठेवण्यात आली असून मंगळवारी (दि. 20) मतमोजणी व निकाल जाहीर करण्यासाठी प्रशासनाने तयारी पुर्ण केली आहे. दरम्यान मतमोजणी 9 टेबल्सवरून होणार असून 6 ते 9 फेरीद्वारे 3 तासात संपूर्ण निकाल हाती येणार असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार डॉ. योगेश देशमुख यांनी दिली. सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरूवात होईल.

मागील काही दिवसांपासून प्रचाराच्या रणधुमाळीत ग्रामीण भागातील वातावरण चांगलेच तापले होते. या ग्रामपंचायत निवडणुकीत 24 सरपंच पदासाठी 92, तर 72 प्रभागातून 119 सदस्य पदासाठी 266 उमेदवार थेट रिंगणात होते. एकूण 22 हजार 792 मतदारांपैकी 21 हजार 831 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे.

दरम्यान एकुण 82.58 टक्के मतदान झाल्यानंतर सर्वच उमेदवार, कार्यकर्त्यांकडून विजयाचे दावे-प्रतिदावे केले जात आहेत. कोणी कितीही दावे केले, तरी निकाल हाती आल्यानंतरच चित्र स्पष्ट होईल. राजकीय पक्षांमधील स्थानिक लोकप्रतिनिधी व पदाधिकाऱ्यांनी उमेदवाराच्या विजयासाठी खिंड लढवली असली, तरी उमेदवारांनी मात्र देव पाण्यात घालून मत मोजणीकडे डोळे लावले आहेत. दुसरीकडे निकालची उत्सुकता शिगेला गेलेले पॅनल लढविणारे गावपुढारी व हौशी कार्यकर्ते गुलाल उधळण्याची प्रतिक्षा करीत आहे.

गावतील निकालाकडे लक्षआमदार प्रकाश पाटील भारसाकळे व जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुधाकर पाटील भारसाकळे यांचे गाव बेलोरा. जिल्हा परिषदेचे माजी आरोग्य सभापती बाळासाहेब हिंगणीकर यांचे बंधूच हिंगणी मिर्झापूर गावात थेट सरपंच पदाच्या निवडणूक रिंगणात आहेत, तसेच तालुका काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष सुनील गावंडे यांचे गोळेगाव-सौंदळी तसेच कोळंबी व गायवाडी ग्रामपंचायतीच्या निवडणुका प्रतिष्ठेच्या असून येथील निकलाकडे राजकीय क्षेत्राचे लक्ष लागून आहे.

''तालुक्यातील 24 ग्रामपंचायतींच्या मतमोजणी प्रक्रियेसाठी महसूल प्रशासन सज्ज आहे. सुरूवातीला प्रत्येक टेबलवर टपाली मतमोजणी करण्यात येईल व त्यानंतर ईव्हीएमवरील मतमोजणी करून टप्प्याटप्प्याने अधिकृत निकाल जाहीर करण्यात येणार आहे.'' - डॉ. योगेश देशमुख, निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार, दर्यापूर

बातम्या आणखी आहेत...