आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

उद्या मतमोजणी, धाकधूक वाढली:मतदानाची अंतीम टक्केवारी पोहोचली 77.71 वर, शेवटच्या 2 तासांत 15.01 टक्क्यांची वाढ

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यातील २५७ ग्रामपंचायतींसाठी पार पडलेले मतदान शेवटच्या क्षणी ७७.७१ टक्क्यांवर पोचले. शेवटच्या दोन तासांत १५.०१ टक्के मतदारांनी मतदान केले. त्यामुळे दुपारी साडे तीन वाजताची ६२.४४ ही टक्केवारी वाढून ७७.७१ टक्क्यांवर स्थिरावली. मेळघाटातील काही मतदान केंद्र दीडशे किलोमीटरहून अधिक दूरवर होती. त्यामुळे शेवटची आकडेमोड करायला रविवारची मध्यरात्र ओलांडून गेली, असे निवडणूक यंत्रणेचे म्हणणे आहे. परिणामी मतदानाची अंतीम आकडेवारी आज, सोमवारी सकाळी जाहीर करण्यात आली.

निवडणुकीसाठी पहिल्या ८ तासांत अर्थात दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ६२.४४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. पुढे दोन तास शिल्लक असल्याने शेवटची आकडेवारी ७५ टक्क्यांवर पोचेल, असा अंदाज यंत्रणेने व्यक्त केला होता. प्रत्यक्षात ही टक्केवारी ७७.७१ वर पोचली. ८१७ पैकी बऱ्याच मतदान केंद्रांवर शेवटच्या दोन तासांत रांगा लागल्याने प्रत्यक्ष मतदान सात वाजेपर्यंत सुरु होते, त्यामुळेही मतदानाची अंतीम आकडेवारी गोळा करण्यात विलंब झाल्याचे निवडणूक अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

२५१ सरपंच आणि सदस्यांच्या १६८४ जागांसाठी रविवारी मतदान घेण्यात आले. सरपंचांसाठी १ हजार ६५७ तर सदस्यांसाठी ३ हजार ८५८ उमेदवार निवडणूक मैदानात आहेत. या सर्वांचे भाग्य उद्या, मंगळवार, २० डिसेंबर रोजी होणाऱ्या मतमोजणीअंती स्पष्ट होणार आहे. या निवडणुकीसाठी ३ लाख ४८ हजार ६३१ मतदार मतदान करणार होते. त्यापैकी १ लाख ४२ हजार ८५८ पुरुष आणि १ लाख २८ हजार ४९ महिला अशाप्रकारे एकूण २ लाख ७० हजार ९०८ मतदारांनी मतदान केले.

उद्या, मंगळवारी या मतांची मोजणी केली जाईल. जिल्हा मुख्यालय असलेल्या अमरावतीसह सर्व १४ तालुक्यांच्या ठिकाणी ही मतमोजणी होणार आहे. त्यासाठी संबंधित यंत्रणा सज्ज झाली असून सकाळी १० च्या ठोक्याला सर्व ठिकाणी मतमोजणी सुरु केली जाईल. मतमोजणीवर नियंत्रणासाठी उपजिल्हा निवडणूक अधिकारी डॉ. नितीन व्यवहारे यांच्या नेतृत्वात स्वतंत्र नियंत्रण कक्ष तयार करण्यात आला असून जिल्ह्याचे मुख्यालय असलेल्या अमरावतीत भातकुली व अमरावती या दोन तालुक्यांची मतमोजणी केली जाणार आहे.

सर्वात जास्त ८४.८७ टक्के मतदान धामणगाव रेल्वे तालुक्यात झाले असून ८४.८४ टक्केवारीसह अंजनगाव सुर्जी तालुका दुसऱ्या स्थानावर पोचला आहे. त्याखालोखाल ८२.७८ टक्के मतदान तिवसा तर ८२.३१ टक्के मतदान तिवसा तर ८२.३१ टक्के मतदान अचलपुर तालुक्यात नोंदले गेले. त्याचवेळी सर्वात कमी ६७.६८ टक्के मतदान भातकुली तालुक्यात झाले. उर्वरित सर्व तालुक्यांची आकेडवारी ७० ते ७९ टक्क्यांदरम्यान आहे.

बातम्या आणखी आहेत...