आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ग्रामपंचायत निवडणुकीसाठी प्रचंड घमासान:दोघांचे अर्ज नामंजूर, मंगळवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आगामी 18 सप्टेंबर रोजी होऊ घातलेल्या ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीतून सदस्य पदासाठीचे दोघांचे अर्ज नामंजूर झाले आहेत. वेगवेगळ्या त्रुट्या असल्याने रद्द झालेल्या या अर्जांमुळे आता 53 सदस्यांसाठी 119 उमेदवार मैदानात उरले आहेत. दरम्यान सदर निवडणुकीसाठी माघार घेण्याचा अंतीम दिवस मंगळवार, 6 सप्टेंबर असल्याने त्याच दिवशी दुपारनंतर उमेदवारांची नेमकी संख्या स्पष्ट होणार आहे.

राज्य निवडणूक आयोगाने घोषित केलेल्या कार्यक्रमानुसार जिल्ह्याच्या अमरावती (रोहणखेडा), चांदूररेल्वे (चांदूरवाडी) व धारणी (हरिसाल) तालुक्यातील प्रत्येकी एका ग्रामपंचायतसह तिवसा तालुक्यातील घोटा, कव्हाडगव्हाण, उभरखेड व आखतवाडा या चार ग्रामपंचायतींची सार्वत्रिक निवडणूक आगामी 18 सप्टेंबर रोजी होत आहे. सरपंचपद थेट जनतेतून निवडायचे असल्याने या निवडणुकीला प्रचंड महत्व प्राप्त झाले आहे. हरिसाल ही 11 सदस्यीय ग्रामपंचायत असून इतर सर्व ग्रामपंचायती ह्या प्रत्येकी सात सदस्यीय आहेत. या सर्व ग्रामपंचायतींसाठी उमेदवारी दाखल करण्याचा 1 सप्टेंबर हा शेवटचा दिवस होता. सातही ग्रामपंचायतींच्या 53 सदस्यपदांसाठी 121 तर आखतवाडा वगळता उर्वरित 6 सरपंचांसाठी 33 अर्ज प्राप्त झाले आहेत. यापैकी किती जण माघार घेतात, हे मंगळवारी स्पष्ट होणार आहे.

आखतवाड्याचे सरपंचपद रिक्त

दरम्यान ओबीसीच्या (नागरिकांचा मागासप्रवर्ग) एकाही उमेदवाराचा अर्ज प्राप्त न झाल्यामुळे तिवसा तालुक्यातील आखतवाड्याचे सरपंचपद व एक सदस्यपद रिक्त राहणार आहे. ही दोन्ही पदे नामाप्र संवर्गाच्या महिलांसाठी राखीव आहेत. मुळात या गावात नामाप्र संवर्गात मोडणाऱ्या जातीतील नागरिक रहात नाहीत. त्यामुळे त्या गावातून कुणीही उमेदवारी अर्ज दाखल करु शकले नाहीत.

यापूर्वी रिक्त राहिले होते सभापतीपद

उमेदवारी अर्ज प्राप्तच न झाल्यामुळे यापूर्वी नांदगाव खंडेश्वर पंचायत समितीचे सभापतीपद रिक्त राहिले होते. एका विशिष्ट संवर्गासाठी राखीव असलेल्या या पदासाठीचा उमेदवार पंचायत समितीत निवडून आला नव्हता. त्यामुळे ही स्थिती निर्माण झाली होती. त्यानंतर दोनदा निवडणूक घोषित करुन तिसऱ्या निवडणुकीवेळी नियमानुसार आरक्षणाचा संवर्ग बदलविण्याची परवानगी राज्य निवडणूक आयोगाने दिली होती.

बातम्या आणखी आहेत...