आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावतीची भूजळ पातळी वाढली:जीएसडीएने वर्षातून 4 वेळा सर्वेक्षण करून काढला निष्कर्ष; जलयुक्त शिवारमुळे सकारात्मक परिणाम

अमरावती5 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

अखंडीत व भरपूर पाऊस, जलयुक्त शिवारसह जलसंधारणाबाबत जनजागृतीमुळे मागील पाच वर्षांत प्रथमच यंदा जिल्ह्यातील भूजल पातळीत 1.79 मी.पर्यंत समाधानकारक वाढ झाली आहे. अन्यथा आजवर चिंताजनकरित्या भूजल पातळीत घट होत होती. 2018 मध्ये तर कमी पाऊस व मोठ्या प्रमाणात भूजलाचा उपसा होत असल्याने 3 मी. पर्यंत घट झाली होती. ती यंदा पूर्णपणे भरून निघाली असून त्यात समाधानकारकरित्या पावणे दोन मी. पर्यंत वाढ झाली हे विशेष.

जिल्ह्यात यंदाच्या पावसाळ्यात 885 मि.मी. सरासरी पावसाची अपेक्षा असताना प्रत्यक्षात आतापर्यंत 1006 मि.मी. पावसाची नोंद झालेली आहे. भुजल सर्वेक्षण विभागाने (जीएसडीए) वर्षातून चार वेळा एप्रिल, जून, सप्टेंबर व ऑक्टोबर महिन्यात 14 ही तालुक्यांमधील 150 निरीक्षण विहिरींचे सर्वेक्षण केले. त्यानंतर भूजल पातळी वाढल्याचे समाधानकारक निरीक्षण नोंदविले आहे.

ऑगस्ट व सप्टेंबर महिन्यात पाऊस सुरूच राहिला. यादरम्यान 84 महसूल मंडळांत अतिवृष्टी झाल्याने भूजलाचे पुनर्भरण झाले व त्याचे सुखद परिणाम आता पुढे आले आहे. मागील पाच वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत यंदा भूजलाची पातळी वाढली आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याचे दुर्भिक्ष्य फारसे जाणवणार नाही. तसेच सिंचनालाही मोठ्या प्रमाणात मदत होणार आहे. कारण अनेक शेतकऱ्यांकडे विहिरी आहेत. भाजीपाला, फुलबागा तसेच फळबागांनाही नियमितपणे पाणी मिळू शकेल.

भूजल सर्वेक्षण विभागाच्या अहवालानुसार मागील पाच वर्षांत एकूण सरासरी 7.39 मी. भूजलाची पातळी राहिली. त्या तुलनेत 1 जानेवारी ते सप्टे. 2022 पर्यंत अर्थात केवळ 9 महिन्यांत 5.60 मी. भूजल पातळी वाढली. ही वाढ ही सरासरी 1.79 मी. अशी समाधानकारक आहे. त्यामुळे यंदा रब्बी हंगामात सिंचनात कोणतीही अडचण राहणार नसल्याने शेतकरी सुखावला आहे.

तालुकानिहाय भूजलस्तराची स्थिती

जीएसडीएच्या माहितीनुसार अमरावती तालुक्यात 1.51 मीटर, भातकुली 2.5, नांदगाव खंडेश्वर 0.37, चांदूर रेल्वे 0.67, तिवसा 2.0, मोर्शी 1.3, वरूड 2.41, अचलपूर 4.3, चांदूरबाजार 4.97, दर्यापूर 1.78, अंजनगाव सुर्जी 2.1, धारणी 0.1, चिखलदरा 0.2 व धामणगाव रेल्वे तालुक्यात 0.9 मी.पर्यंत अशी एकूण सरासरी 1.79 मी.पर्यंत भूजलात वाढ झाली आहे.

….

मेळघाट माघारले, चांदूर बाजार सर्वाधिक

यंदाच्या पावसाळ्यात चिखलदरा व धारणी तालुक्यात सरासरीच्या तुलनेत ९० ते ९५ टक्क्यांपर्यंत पावसाची नोंद झाली. परंतु, विपरित भौगोलिक स्थितीमुळे पाणी जमिनीत मुरण्याऐवजी वाहून गेले. परिणामी या दोन्ही तालुक्यांतील भूजल स्तरात अनुक्रमे ०.१० ते ०.२० मीटरपर्यंत वाढ नोंदविली आहे. त्यातुलनेत अचलपूर तालुक्यात ४.३० व चांदूरबाजार तालुक्यात जिल्ह्यात सर्वाधिक ४.९७ मीटरपर्यंत भूजलात वाढ नोंदविण्यात आलेली आहे.

…..

बातम्या आणखी आहेत...