आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चैत्राचे नवरात्रोत्सव:साडेतीन मुहूर्तापैकी एक गुढीपाडवा आज, चैत्र नवरात्रोत्सवालाही सुरुवात; अमरावतीचे आराध्य दैवत आई श्री अंबादेवी व आई श्री एकविरा देवी मंदिरात चैत्राचे नवरात्रोत्सव

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

चैत्र महिन्याचा पहिला दिवस अर्थात पाडवा म्हणजे मराठी नवीन वर्षाचा पहिला दिवस, गुढी पाडवा. हा साडेतीन मुहूर्तापैकी एक पूर्ण मुहूर्त आहे. तसेच या दिवसापासून अमरावतीचे आराध्य दैवत आई श्री अंबादेवी व आई श्री एकविरा देवी मंदिरात चैत्राचे नवरात्रही सुरू होत आहे. राम नवमीपर्यंत व दिवस हे नवरात्र चालणार असल्याने याला रामाचे नवरात्रही म्हटले जाते. घटस्थापना, ध्वजारोहण, सप्तशती पाठ, आरती व धार्मिक कार्यक्रम या नऊ दिवसांत घेतले जातात. शारदीय नवरात्राप्रमाणेच चैत्र नवरात्रातही भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करतात अशी माहिती श्री अंबादेवी संस्थानाचे विश्वस्त डॉ. जयंत पांढरीकर यांनी दिली.

शुभ मुहूर्त असल्यामुळे नवीन उद्योग, व्यवसायाचा शुभारंभ, सोने, चांदी, वाहन, घर व भुखंड खरेदीसाठी चैत्र शुद्ध प्रतिपदेचा हा उत्तम मुहूर्त मानला जातो. अंगणात दरवाजापुढे मांगल्याचे प्रतिक गुढी उभारून नव्या संकल्पाचा शुभारंभ केला जातो. राशीचक्राची सुरुवात मेष राशीपासून होते. चैत्र महिन्यात सूर्य मेष राशीत प्रवेश करतो म्हणून चैत्र हा वर्षातील पहिला महिना आहे. चैत्र महिन्यातील पौर्णिमेला चित्रा नक्षत्रात चंद्र असतो. म्हणून त्या क्षत्रावरून चैत्र हे नाव या महिन्याला पडले.

वर्षारंभाचा दिवस असल्यामुळे खागोलिय गणितानुसार ही या दिवसाला विशेष महत्त्व आहे. स्नान केल्यानंतर गुढी उभारण्यासाठी बांबूची लांब काठी धुवून, पुसून वापरावी. त्याला रेशमी वस्त्र गुंडाळून त्यावर घरातील कोणतेही स्वच्छ धातुचे भांडे ठेवावे. गुढीला कडूनिंबाची पाने, आंब्याच्या डहाळ्या बांधाव्यात. साखरेची माळ घालावी. जिथे गुढी उभारायची आहे, ती जागा स्वच्छ करून रांगोळी काढावी. त्यावर पाट ठेऊन गुढी उभारावी. हळद, कुंकू, फुलांची माळ घालून गुढीची पूजा करावी. ब्रह्मदेवाने या सृष्टीला चालना दिली असल्याने तिला ब्रह्मध्वज असेही म्हणतात. पंचांगांचे पूजन, केल्यानंतर कडूनिंब, गुळ, जिरे घालून केलेले आरोग्यदायी पाणी प्यावे, असे पं.शाहकार यांनी सांगितले आहे.

बातम्या आणखी आहेत...