आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करातारखेडा आसीर कॉलनी येथे ५० खाटांचे पहिले मनपा रुग्णालय शुक्रवार १७ पासून सुरू झाले. या रुग्णालयात स्त्री रोग, बालरोग, सर्वसामान्य औषधींसह तपासणी व लसीकरण या सुविधा राहणार आहेत. येथे पीडीएमसी हॉस्पिटलमधील ३ डॉक्टरांची सध्या सेवा घेतली जात आहे. या रुग्णालयात लवकरच रुग्ण दाखल करून घेण्याची सोय (आंतररुग्ण विभाग) केली जाणार आहे. मनपा प्रशासकांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नातून हे मनपा रुग्णालय आता रुग्ण सेवेत सज्ज झाले आहे. आगामी पावसाळ्याचे दिवस लक्षात घेता या रुग्णालयात साथरोग निवारणार्थ प्रभावी उपचार यंत्रणा कार्यान्वित करून सूतिकागृह सुरू करण्यात आले. यावेळी सुयोग्य नियोजन व आरोग्य सेवा सुविधांसंदर्भात प्रशासक डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी आसीर कॉलनी येथील मनपा दवाखाना येथे व्यवस्था करण्याबाबत निर्देश दिले होते. शहरांतर्गत मनपाच्या शहरी आरोग्य केंद्रामध्ये आरोग्य विषयक सुविधा निर्माण करून येथील वैद्यकीय सेवा आणखी वाढवण्यावर मनपा प्रशासन भर देत आहे. अशातच आसीर कॉलनी मनपा दवाखान्याची परिपूर्ण बांधकाम असलेली इमारत ही बंद अवस्थेत असल्याने निरुपयोगी ठरत होती. या इमारतीत स्थानिकांसाठी प्राथमिक रुग्णालय व सूतिकागृह उभारण्यासाठी मनपा प्रशासनाने निधी मंजूर करून दिला. निधी प्राप्त होताच तेथील स्थापत्य व विद्युतीकरणाचे काम करण्यात आले. यासह वैद्यकीय उपकरणे, फर्निचरचीही उपलब्धता करण्यात आली आहे. त्यामुळे हा दवाखाना रुग्णेसेवेसाठी सज्ज आहे. मनपाच्या आसीर कॉलनी सूतिकागृह रुग्ण सेवेत सज्ज असून सुरुवातीला या ठिकाणी बाह्य रुग्ण विभाग सुरू करण्यात आल्याची माहिती मनपा आरोग्य अधिकारी डॉ. विशाल काळे यांनी दिली. दवाखान्यात नोंदणी विभाग, औषध वितरण कक्ष, इंजेक्शन व रक्त नमुने तपासणी कक्ष, स्टाफ रूम तयार करण्यात आले आहे. रुग्ण व नातेवाइकांसाठी पिण्याचा पाण्याचा पुरवठा व्हावा म्हणून मजीप्राकडून पाइप लाइन टाकण्यात आली आहे, लगतच परिसरात पेव्हिंग ब्लॉक बसवण्यात आले आहेत, आरोग्याच्या दृष्टीने साफसफाई महत्वाची असून स्वच्छता विषयक कामांचे नियोजन करण्यात आले आहे, परिसरात सौंदर्यीकरण, वृक्ष लागवड करून रुग्णांना बसण्यासाठी बाक लावण्याचे नियोजन करण्यात आले आहे. कोरोनानंतर आता अन्य आजार, साथरोग, महिला आरोग्य यावर लक्ष केंद्रीत करण्याची गरज आहे. त्यामुळे मनपा आरोग्य सुविधांच्या कक्षा विस्तारून रुग्ण सेवा अधिक बळकट करण्याचा हा प्रयत्न आहे. मोदी हॉस्पिटलमध्येही करणार ५० खाटांची सोय यानंतर मोदी हॉस्पिटलमध्येही ५० खाटांची सोय केली जाणार आहे. सध्या येथे दुरुस्तीचे काम सुरू आहे. साहित्य मागवण्यासाठी निविदा प्रक्रिया राबवली जाणार आहे, अशी माहिती प्रशासक डॉ. प्रवीण आष्टीकर यांनी दिली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.