आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धुवाधार पाऊस:तिवसा तालुक्यात धुवाधार पाऊस

तिवसा24 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

तालुक्यात पावसाने चांगलेच थैमान घातले असून, रविवारी पुन्हा काही दिवसांची उसंत दिल्यानंतर चौथ्यांदा पावसाने धुवाधार बॅटिंग करत तिवसा तालुका जलमय करून सोडला आहे. यामुळे शेतकरी वर्ग मेटाकुटीला आला असून, नुकसानीचा फटका बसला आहे.

तिवसा तालुक्यात पावसाने पूर्वीच सरासरी ओलांडली असताना काही दिवस उसंत देत पावसाची हजेरी होत आहे. गेल्या दोन दिवसांपासून तालुक्यातील नागरिक प्रचंड उकाड्यामुळे हैराण झाले असताना ४ सप्टेंबरच्या पहाटे पासून जवळपास ६ तास अखंडित पाऊस कोसळला. यात तालुक्यातील वरखेड गावात जोरदार पावसाने हजेरी लावल्याने अवघे गाव जलमय झाल्याचे दृश्य पाहायला मिळाले. गावातील रस्त्याला चक्क पुराचे स्वरूप आले होते. त्याचप्रमाणे दोन दिवसांपासून पावसाने उसंत दिल्याने शेतकरी वर्ग आहे त्या पिकाला जगवण्यासाठी फवारणीच्या कामी लागला असताना आजच्या पावसाने फवारणीच्या खर्चावरही पाणी फेरले आहे.

एकूणच यावर्षीच्या पावसाने शेतकऱ्यांची चिंता वाढवली असून, सरासरी उत्पन्नात मोठी घट निर्माण होत असल्याचे दिसून येत असल्याने या बाबीची शासनाने नोंद घेऊन तिवसा तालुका ओला दुष्काळ घोषित करून शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य देण्याची मागणी होऊ घातली आहे. दरम्यान, ज्या घरी महालक्ष्मी देवींची स्थापना झाली आहे, त्या ठिकाणी रविवारीच महालक्ष्मींसाठी प्रसाद असून त्यानिमित्त अनेक घरी महाप्रसादाचेही आयोजन करण्यात आले आहे. त्यामुळे कार्यक्रमात पाऊस अडसर ठरल्याचे चित्र दिसून आले.

जिल्ह्यात पावसाची सर्वदूर रिपरिप अमरावती | आठ ते दहा दिवसांची उघडीप दिल्यानंतर रविवारी (दि. ४) शहरासह जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे. यावेळी काही ठिकाणी मुसळधार तर काही भागात हलका ते मध्यम पाऊस कोसळला आहे. रविवारी सकाळपासून पाऊस सुरू झाल्यानंतर काही भागात मेघ गर्जनेसह पाऊस कोसळला. दरम्यान, मागील आठ ते दहा दिवसांपासून जिल्ह्यातील काही भागात पाऊस नव्हता. त्यामुळे अशा भागात कपाशीसह सोयाबीन या पिकांना पाण्याची नितांत गरज होती. मात्र, ज्या भागात सतत पाऊस सुरू आहे, त्या भागात मात्र, या पावसाने पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या चिंतेत भर टाकली आहे. दरम्यान, हा पाऊस ८ सप्टेंबरपर्यंत जिल्ह्यातील बहुतांश सर्वच भागात हलका ते मध्यम स्वरुपात राहणार असल्याचा अंदाज कृषी हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान,रविवारी सकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर शहरात तर चांगलाच होता. सकाळी ९ वाजेच्या सुमारास मुसळधार पाऊस आणि विजांचा गडगडाट सुरू झाला होता.

बातम्या आणखी आहेत...