आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराना घोडा, ना बँडबाजा, ना फटाके, ना कुठला बडेजाव पण तरीही तो लग्न समारंभ होता. यामध्ये धान्य रुपी अक्षताही नव्हत्या, तर त्यांची जागा विविध जातीच्या रंग-बिरंगी सुवासिक फुलांच्या पाकळ्यांनी घेतली होती.
रुढी-परंपरागत सर्व प्रथांना फाटा देत पार पडलेल्या या विवाह सोहळ्याची सध्या चांगलीच चर्चा आहे. हा विवाह सोहळा मोर्शी तालुक्यातील लेहेगावचे माजी सरपंच डॉ. अनिल तट्टे यांचा मुलगा कुलदीप आणि वर्धा जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष तथा आर्वीचे ज्येष्ठ विधीज्ञ अॅड. सुरेंद्र जाणे यांची मुलगी मृदुलचा होता.
एरवी विवाह सोहळा म्हटला की भरपूर अनावश्यक खर्च केला जातो. परंतु हा आदर्श विवाह सोहळ्यातून सामाजिक उद्दिष्ट साध्य केले गेले. विवाह विधी उरकल्यानंतर लगेच वृक्षारोपण करुन आलेल्या पाहुण्यांना फळझाडांचे वितरण करण्यात आले. तर स्वागत सोहळ्यादरम्यान अंध-अपंगांना किराणा वाटप तसेच तृतीयपंथीयांना आर्थिक मदत व कपडे वाटप करण्यात आले. लग्नविधीपूर्वी वधू-वराच्या हस्ते माँ जिजाऊ आणि छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तर स्वागत सोहळ्यात संत गाडगेबाबा आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करुन जिल्ह्यातील थोर संतांचा महीमा सर्वांसमोर मांडण्यात आला.
आर्वी येथे पार पडलेल्या या शिव मंगल सोहळ्याला विविध राजकीय पक्षाचे नेते, पदाधिकारी यांनी उपस्थिती दर्शवून वधू-वरांना शुभाशिर्वाद दिले. यामध्ये जिल्ह्याच्या पालकमंत्री अॅड. यशोमती ठाकूर, आचार्य कमलताई गवई, आमदार प्रवीण पोटे, दादाराव केचे व सुलभाताई खोडके, श्री. शिवाजी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष हर्षवर्धन देशमुख, माजी मंत्री डॉ. सुनील देशमुख, कम्युनिस्ट नेते भाई संजय मंगळे, दादासाहेब गवई चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्ष किर्ती अर्जुन, संभाजी ब्रिगेडचे प्रवक्ते प्रा. प्रेम कुमार बोके आदी मान्यवरांचा समावेश आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.