आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

81 वर्षांची परंपरा:सामाजिक एकोप्यासाठी जनजागृतीचा वसा अन् वारसा ; लोकमान्य टिळकांच्या आवाहनाला प्रतिसाद

येवदा21 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

लोकमान्य टिळक यांनी स्वातंत्र्य लढ्यात युवकांचा सहभाग वाढावा, नागरिकांमध्ये एकजूट निर्माण व्हावी या उद्देशाने सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत प्रत्येक शहर, प्रत्येक गावात सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्थापन झाले. दर्यापूर तालुक्यातील येवदा येथे सुद्धा त्यांच्या आवाहनानुसार १९४१ मध्ये तत्कालीन युवकांनी एकत्र येत तरुण उत्साही गणेशोत्सव मंडळाची स्थापना केली. यंदा या मंडळाच्या गणेशोत्सवाचे ८१ वे वर्ष आहे.

स्वांतत्र्यपूर्व काळात स्थानिक ढोमनपुरा येथील हनुमान मंदिरात गणेशाची स्थापना करण्यात आली होती. तेव्हापासून आजतागायत तेथेच गणेशोत्सव साजरा करण्याची परंपरा आहे. नागरिकांमध्ये स्वातंत्र्याची ज्वाला गणेशोत्सवाच्या माध्यमातून तेवत ठेवण्याच्या सामाजिक भावनेतून स्थापन झालेले हे मंडळ आजही विविध सामाजिक उपक्रम राबवत असून त्या माध्यमातून नागरिकांमध्ये सामाजिक एकोपा निर्माण करण्यासाठी जनजागृती करत आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी सामाजिक संदेश देणारे विविध देखावे सादर करून शहरातून फेरी काढण्यात येते. जातीय सलोख्याचे उत्तम दर्शन या गणेशोत्सवा दरम्यान दिसून येते. सर्व जाती धर्मातील नागरिक गणेशोत्सवामध्ये मोठ्या संख्येने उपस्थिती लावतात.

स्वातंत्र्यपूर्व काळात येवदा येथील रहिवासी मधुकरराव वांदे यांच्या पुढाकाराने या गणेशाची स्थापना करण्यात आली. त्या वेळी त्यांच्यासोबत रामराव जुमळे, रामकृष्ण तिडके, रामकृष्ण लायडे, जयदेवराव बढे, जनार्दन गावंडे, नामदेव वांदे आदींनी यशस्वीपणे सामाजिक एकजूट निर्माण करत इंग्रजांविरुद्ध लढण्याची सुद्धा तयारी ठेवली होती. प्रत्येक वेळी मंडळाच्या नावानुसार नवीन युवक ही जबाबदारी सांभाळत असतात. दररोज लहान मुलांकरिता विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येत आहे. मंडळात ज्येष्ठ सभासद बबनराव वांदे यांच्या मार्गदर्शनात सर्व उपक्रम दरवर्षी पार पडतात. मंडळाचे संस्थापक अध्यक्ष मधुकरराव वांदे यांच्या कुटुंबाला आजही प्रथम पूजेचा मान दिला जातो. तसेच येथील नागरिक राजेंद्र मामनकर यांच्यातर्फे गणेशाची मूर्ती मंडळाला उपलब्ध करून दिली जाते.

मंडळाची कार्यकारिणी
या वर्षी स्थापन करण्यात आलेल्या मंडळाच्या कार्यकारिणीचे अध्यक्ष अक्षय गावंडे असून, उपाध्यक्ष पदाची जबाबदारी चेतन तिडके यांच्याकडे आहे. विकास डिके सचिव असून सदस्य म्हणून महेश वांदे, परीक्षित चोरे, शुभम सोनटक्के, सूरज चोरे जबाबदारी पार पाडत आहेत.

बातम्या आणखी आहेत...