आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करा18 डिसेंबर रोजी होऊ घातलेल्या 24 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचार कार्याला प्रचंड वेग आला आहे. गावातील गल्लीबोळात, चौका-चौकात बॅनर्स लागले आहेत. फलकावर पॅनलचे नाव, कोणता उमेदवार कोणत्या वार्डात उभा आहे, त्याची निवडणूक निशाणी कोणती, असा ठळक मजकूर लिहिला आहे. एकंदरीत यावेळी पहिल्यांदाच ग्रामपंचायतीची निवडणूक हायटेक झाली असून त्यात चांगलीच रंगत दिसून येत आहे.
प्रचारकार्यात प्रामुख्याने सकाळपासून ते रात्री उशिरापर्यंत डोअर टू डोअर पोहचून मतदारांच्या भेटी आणि मौखीक प्रचारावर जोर दिला जात आहे. तर काही उमेदवार मतदारांना आपलेसे करण्यासाठी रात्रीच्या ओल्या पार्ट्यांवर जोर देत आहेत. शुक्रवार, 16 डिसेंबरच्या सायंकाळी प्रचार तोफा थंंडावणार आहेत.
गावस्तरावर ग्रामपंचायत निवडणूक ही प्रतिष्ठेची मानली जात असल्याने सत्ताधारी व विरोधक अशा दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. ग्रामपंचायत निवडणूक ही पक्षाऐवजी स्थानिक आघाडी व पँनलच्या नावाने लढविली जात असल्याने थेट राजकीय हस्तक्षेप या निवडणुकीत दिसून येत नाही. परंतु कुठलीही निवडणूक ही राजकारणाविना लढली जात आहे, असेही चित्र नाही.
थेट जनतेतून निवडल्या जाणाऱ्या सरपंचपदाच्या 24 पदासाठी 92 तर 176 सदस्यपदासाठी 266 उमेदवार मैदानात आहेत. या सर्वांना एकूण एक खर्चाचा हिशेब महसुल प्रशासनास द्यावा लागत आहे. तसे न झाल्यास पुढील 6 वर्षे निवडणुकीपासून बाद व्हावे लागणार आहे. त्यामुळे उमेदवारांना प्रचारासोबत आपल्या खर्चाचा हिशेब देण्याकडेही लक्ष पुुरवावा लागत आहे. आपआपल्या गावातील लढती नेमक्या कशा होतील, अपक्ष उमेदवार कोणत्या वार्डांत कोणाचे गणीत बिघडवणार, लढतीचे निकाल कुणाच्या बाजूने लागतील याकडे तालुक्याचे लक्ष लागून असले तरी मत मोजणीनंतरच खरे चित्र स्पष्ट होणार आहे.
दुसरीकडे निवडणूक होत असलेल्या 24 गावातील अपक्ष उमेदवारही मागे नाहीत. तेही आपापल्या परीने मतदार राजापर्यत पोहचण्यासाठी सोशल मीडियाचा मोठ्या प्रमाणावर वापर करत आहेत. निवडणूक होत असलेल्या अनेक गावात सरपंच पदासह सदस्य पदाच्या लढतीत प्रतीस्पर्धी म्हणून नवखे तरुण उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे गावातील राजकारणात अनुभवी व प्रस्थापित समजल्या जाणाऱ्या पुढाऱ्यांना नवयुवकांनी थेट आव्हानच दिले आहे.
निवडणुकीमुळे थकीत कराचा भरणादेखील मोठ्या प्रमाणात झाला आहे. दर्यापूर तालुक्यात होऊ घातलेल्या 25 ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणूकीमूळे गावा-गावातील ईच्छूक उमेदवारांना त्यांच्या कडील थकीत कराचा भरणा करणे बंधनकारक होते. त्यामुळे तब्बल 20 ते 25 वर्षांपासून थकीत असलेला करही या अनुषंगाने वसूल होऊ शकला. त्यामुळे बहुतांश ग्रामपंचायतीच्या महसुलात भर पडली.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.