आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करागरीबांचा दवाखाना म्हणून ओळख असलेले येथील अंबादेवी संस्थानचे रुग्णालय गेल्या तीन महिन्यांपासून बंद आहे. अंबादेवी रोडवरील डॉ. जोशी ट्रस्ट यांच्या भाड्याच्या जागेत हे रुग्णालय सुरु होते. परंतु जागेचा करारनामा वाढवून न मिळाल्यामुळे अचानक ते बंद करण्यात आले. एकाएकी ओढवलेल्या या संकटामुळे शहरातील गरीब रुग्णांची परवड होत असून, त्यांच्यावर इतर रुग्णालयातील महागड्या सेवा घेण्याची वेळ आली आहे. दुसरीकडे संस्थानने पर्यायी जागेचा शोध घेतला असून, लवकरच रुग्णालय पूर्ववत सुरु करण्यात येईल, अशी तयारीही सुरु केली आहे. सोनोग्राफी व एक्स रे सह रक्त, लघवी, थुंकीच्या वेगवेगळ्या चाचण्या आणि प्रत्येक रोगाचे निदान तसेच उपचार या रुग्णालयातून केले जातात. त्यामुळे शहराच्या बहुतांश मागास व अल्पसंख्याक भागातील नागरिक या दवाखान्यावर विसंबून आहेत. सध्या जागेच्या वादात सारेच ठप्प झाल्याने गरिबांच्या दवाखान्याला चक्क टाळे लागले आहेत. डॉ. जोशी ट्रस्ट व अंबादेवी संस्थान यांच्यात झालेल्या करारानुसार १९८४ पासून हा दवाखाना सुरु झाला. पुढे १९९१ साली उभय संस्थांमध्ये ३० वर्षांसाठी लेखी करार झाला. हा करार सन २०१९ मध्ये संपला. परंतु त्यानंतर डॉ. जोशी ट्रस्टकडे विनंती करुनही मुदतवाढ मिळाली नाही. त्यामुळे फेब्रुवारीपासून रुग्णालयाच्या सेवा बंद कराव्या लागल्या, असे अंबादेवी संस्थानच्या विश्वस्तांचे म्हणणे आहे.
दररोज दीडशेवर तपासण्या, चाचण्या अंबादेवी संस्थानच्या रुग्णालयात दररोज दीडशेवर तपासण्या आणि चाचण्या केल्या जातात. ८० एक्स रे, साठ ते सत्तर सोनोग्राफी आणि तेवढ्याच पॅथॅलॉजी टेस्टची याठिकाणी नोंद आहे. सर्वांत स्वस्त सोनोग्राफीसाठी हे रुग्णालय प्रसिद्ध आहे. त्यामुळे अल्पसंख्याक आणि मागास वस्त्यांमधील हे हक्काचे रुग्णालय म्हणून ओळखले जाते.
हा दवाखानाच आशेचा किरण ^अंबादेवी संस्थानचे रुग्णालय हे अमरावती शहरातील गरीब व अल्पसंख्यक समाजातील रुग्णांसाठी आशेचा मोठा किरण आहे. त्यामुळे ते अशाप्रकारे बंद पडणे योग्य नाही. संस्थानने ते लगेच पर्यायी जागेत सुरु करुन दिलासा द्यावा. -जगदीशप्रसाद श्रीवास, मसानगंज, अमरावती.
दुप्पट पैसे का मोजावे ? ^माझ्या कुटुंबीयांना माफक दरात आरोग्यसेवा प्राप्त व्हायच्या. परंतु रुग्णालय बंद पडल्याने नाइलाजास्तव दुप्पट रक्कम खर्चून इतर खासगी दवाखान्यांच्या सेवा घ्याव्या लागतात. संस्थानने ही पिळवणूक थांबावी. -कमलाकर पिढेकर, महाजनपुरा, अमरावती.
दवाखाना लवकर सुरू करावा ^अंबादेवी संस्थानचे रुग्णालय हे शहरातील गरीब व गरजू रुग्णांसाठी अत्यंत महत्वाचे दालन आहे. त्यामुळे अंबादेवी संस्थानने पर्यायी जागेचा शोध घेऊन किंवा संस्थांकडे उपलब्ध असलेल्या जागेत हा दवाखाना सुरु करावा. -विलास पवार, हनुमाननगर, अमरावती.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.