आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नायब तहसिलदारपदी बढतीसाठी 13 डिसेंबरला आयुक्त कार्यालयावर ​​​​​​​उपोषण:21 डिसेंबरला ठेवणार लेखणीबंद, 26 डिसेंबरपासून बेमुदत संपाचा इशारा

अमरावती4 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

नायब तहसिलदारपदी बढती मिळण्यासाठी महसूल खात्यातील अव्वल कारकून आगामी 13 डिसेंबरला विभागीय आयुक्त कार्यालयावर एक दिवसीय लाक्षणिक उपोषण करणार आहेत. शुक्रवारच्या निदर्शनानंतरही हा मुद्दा निकाली न निघाल्यामुळे विभागीय महसूल कर्मचारी संघटनेतर्फे हा निर्णय घेण्यात आला असून 21 ला लेखणीबंद तर 26 पासून बेमुदत संपाची नोटीस देण्यात आली आहे.

पश्चिम विदर्भातील अकोला, बुलडाणा, वाशिम, यवतमाळसह अमरावती जिल्ह्यात नायब तहसीलदारांची अनेक पदे रिक्त आहेत. तर दुसरीकडे या पदासाठी पात्र असलेल्या अव्वल कारकूनांची संख्याही पुरेशी आहे. परंतु प्रशासकीय अनास्थेमुळे अद्यापही हा तिढा सुटला नाही. त्यामुळे आंदोलनासारखा टोकाचा निर्णय घेण्यात आल्याचे कर्मचारी संघटनेचे म्हणणे आहे. संघटनेने घेतलेल्या निर्णयानुसार आंदोलनाची श्रृंखला 1 डिसेेंबरपासून सुरू झाली.

दुपारच्या सुटीतील त्यादिवशीच्या निदर्शनानंतर 3 डिसेंबरपर्यंत काळ्या फिती लावून काम करण्यात आले. त्यानंतर 5 डिसेंबरला तहसील व जिल्हा कचेरीसमोर निदर्शने करण्यात आली आणि शुक्रवार, 9 डिसेंबरला विभागीय आयुक्त कार्यालयापुढे धरणे देण्यात आले.

आता त्याहीपुढचा टप्पा म्हणून 13 डिसेंबर रोजी त्याच कार्यालयापुढे लाक्षणिक उपोषण केले जाईल. त्यानंतर 21 डिसेंबरला लेखणीबंद आंदोलन करुन 23 ला एक दिवसाचा लाक्षणिक संप तर 26 डिसेंबरपासून बेमुदत संप पुकारला जाणार आहे. याबाबतची सूचना विभागीय आयुक्तांना देण्यात आली असून इतर संबंधित अधिकाऱ्यांनाही त्याबाबत अवगत करण्यात आल्याचे म.रा. महसूल कर्मचारी संघटनेचे विभागीय सरचिटणीस नामदेव गडलिंग यांनी स्पष्ट केले.

आंदोलनानंतर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांचे सविस्तर निवेदन विभागीय आयुक्तांना देण्यात आले. निवेदनावर विभागीय सचिव नामदेव गडलिंग यांच्यासह संघटनेचे राज्य संघटक नंदकुमार बुटे, उपाध्यक्ष अजय पिंपरकर, सहसचिव आशिष ढवळे, विभागीय अध्यक्ष संजय टेंभेकर, कार्याध्यक्ष आशिष जयसिंगपुरे, कार्यकारिणी सदस्य रंगराव ढोके, स्थानिक पदाधिकारी श्याम मिश्रा आदींच्या स्वाक्षरी आहेत.

संघटनेच्यामते अमरावती विभागातील अव्वल कारकून संवर्गातील काही कर्मचाऱ्यांची पदोन्नती सन 2022 मध्ये करण्यात आली. परंतु त्यावेळी नायब तहसिलदारांची सर्व रिक्त पदे विचारात घेण्यात आली नाही. इतर विभागांच्या तुलनेत अमरावती विभागात त्यावेळी सर्वात कमी कर्मचाऱ्यांना पदोन्नती देण्यात आली. इतर विभागात तदर्थ पदावरील कर्मचाऱ्यांचाही विचार केला गेला. त्यामुळे तेथे अनेकांचा फायदा झाला. त्याचवेळी अमरावती विभागात मोठा अनुशेष निर्माण झाला आहे. एकीकडे पात्र कर्मचारी, त्याचवेळी दुसरीकडे रिक्त जागा असा विरोधाभासही त्यामुळेच निर्माण झाला.

रिक्त पदे 75, उपलब्ध कर्मचारी 100

पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणानुसार सध्या अमरावती विभागात नायब तहसिलदाराची किमान 75 पदे रिक्त असून तदर्थ पर्यायाचा विचार करता अव्वल कारकुनांची संख्या सुमारे 100 आहे. त्यामुळे पदोन्नती दिल्यास अनुशेष दूर होईल.

बातम्या आणखी आहेत...