आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘कडू’बोल; बच्चू कडूंचा इशारा:पहिली वेळ हाेती म्हणून माफ केलं, मात्र वाटेला आले तर काेथळा काढू

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

आ. रवी राणा आणि आ. बच्चू कडू या अमरावती जिल्ह्यातील दोन आमदारांमध्ये मागील दहा दिवसांपासून आरोप-प्रत्यारोप सुरू होते. मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांनी मध्यस्थी केल्यानंतर आ. राणांनी सोमवारी दिलगिरी व्यक्त केली, तर कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत भूमिका मांडू, असे आ. कडू यांनी सांगितले होते. राणा प्रकरणाचा विषय आता संपला आहे. ते दोन पावलं मागे आल्यामुळे आम्ही चार पावलं मागे येत आहोत, असे सांगत मंगळवारी ( १ नोव्हेंबर) जिल्ह्यासह राज्यातील हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत झालेल्या मेळाव्यात आ. कडू यांनी इशारा दिला की, पहिली वेळ होती म्हणून माफ केलं, मात्र आमच्या वाटेला कुणी आलं तर कोथळा बाहेर काढू.

आ. बच्चू कडू म्हणाले की, प्रहार हा आंडूपांडूचा पक्ष नाही. आम्ही दिसायला कमी असलो तरी आमच्याजवळ बाजी, तानाजी आहेत. त्यामुळे मैदानात आले तर मैदानात. सत्ता गेली चुलीत. आमच्यावर २० वर्षांत ३५० गुन्हे दाखल आहेत. बाकीचे नेते लढ म्हणतात, आम्ही मात्र स्वत: लढतो. जनतेची सेवा करतो म्हणूनच चार-चार वेळा आमदार म्हणून निवडून येतो. दिव्यांग, गरजूंसाठी आम्ही अन् आमचा कार्यकर्ता जगतो. रक्ताचे पाणी करतो. दिव्यांगांचा वापर करून राजकारण करत नाही, दिव्यांगांचा वापर करून राजकारण करीन तर दफन होऊन जाईन.

आम्ही गुवाहाटीला गेलो ते केवळ विकासासाठी. मात्र, आम्ही पाठिंबा दिला तर बदनामी सुरू केली. आयुष्यभर आंदोलनं केली, पुढेही तेच करायचे का? म्हणून सत्तेत गेलो ते सर्वसामान्यांसाठीच. आमचे निर्णय कडू असले तरी मात्र काम गोड राहते. आम्ही तत्त्वांशी तडजोड करत नाही. ही बंडखोरी नाही तर उठाव आहे, असेही आ. कडू म्हणाले. याचा अर्थ कोणीही उठावं आणि आम्हाला बोलावं हे सहन केले जाणार नाही. आम्ही गांधीजींना मानतो, पण आमच्या डोक्यात भगतसिंग आहे. पण जे झालं ते झालं, यापुढे आम्हीसुद्धा उगाच बोलणार नाही, आचारसंहितेचे पालन करणार, असेही बच्चू कडू म्हणाले. आता मंत्रिमंडळातून सत्ता पाहायची आहे आम्ही सामान्यांसाठी सातत्याने आंदोलने केली. वेळ आली तर पुढेही करू. आम्ही १५ वर्षे सत्ता बाहेरून पाहिली. आता मात्र मंत्रिमंडळातून सत्ता पाहायची आहे, अशी मंत्रिपदाबद्दलची जाहीर इच्छासुद्धा आ. कडू यांनी व्यक्त केली. पुढील काळात किमान १० आमदार निवडून आणण्याचा निश्चयही कडूंनी बोलून दाखवला.

बातम्या आणखी आहेत...