आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाणीबाणी:सलग 5 दिवस पाणी मिळणार नसेल तर सांगा कसे जगायचे? ; } जलवाहिनी पुन्हा फुटल्याने दुसऱ्यांदा ओढावले संकट

अमरावती19 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाची मुख्य जलवाहिनी पुन्हा जुन्याच ठिकाणी फुटल्याने आठवडाभरात अमरावती करांवर नव्याने पाण्यासाठी धावाधाव करण्याची वेळ ओढावली आहे. जलवाहिनीची दुरुस्ती दोन दिवस चालणार असल्याने शुक्रवारी दुपारपासून पुढचे अडीच दिवस पाणीपुरवठा बंद असेल, असे अधिकृत पत्र ‘मजीप्रा’ने जारी केले आहे. परंतु ‘मजीप्रा’च्या वेळापत्रकानुसार शहरातील काही भागात सलग पाच दिवस पाणीपुरवठा होणार नाही, ही वस्तुस्थिती आहे. या पार्श्वभूमीवर सलग पाच दिवस पाणी मिळणार नसेल तर सांगा कसे जगायचे, असा प्रश्न त्या भागातील नागरिकांकडून विचारला जात आहे. रहाटगावनजिक गेल्या ३ जून रोजी ‘मजीप्रा’ची मुख्य जलवाहिनी फुटली होती. जलवाहिनीतील एक जलवाहिनी अत्यंत जर्जर झाल्याने तो आधी लिक झाली आणि नंतर फुटली, असे ‘मजीप्रा’ने त्यावेळी स्पष्ट केले होते. त्यामुळे तीन दिवसांच्या दुरुस्ती कार्यानंतर जलवाहिनीचा तेवढा भाग बदलण्यात आला. परंतु दुरुस्ती करताना जलवाहिनीच्या आतील रबरी गास्केट व्यवस्थित न लागल्याने शुक्रवारी पुन्हा जुन्याच ठिकाणाहून जलवाहिनी फुटली. परिणामी पुन्हा एकदा अमरावती व बडनेरावासीयांचा पाणीपुरवठा बंद केला. शहराला एक दिवसाआड पाणीपुरवठा केला जातो. दरम्यान, शुक्रवारी दुपारनंतर ज्यांच्याकडे नळाला पाणी आले नाही, त्यांना पुढे रविवारी सायंकाळी पाणी मिळणार होते. परंतु दुरुस्ती कार्य तत्पूर्वी पूर्ण होणे शक्य नसल्याने रविवारी पाणीपुरवठा बंद असेल, असे ‘मजीप्रा’ने याआधीच स्पष्ट केले. दुसरीकडे ‘मजीप्रा’च्या जुन्या वेळापत्रकानुसार रविवार नंतर या भागाला मंगळवारी सायंकाळी पाणीपुरवठा केला जाईल. अशाप्रकारे शुक्रवार ते मंगळवार असे सलग पाच दिवस या भागातील नागरिकांना ‘मजीप्रा’च्या पाण्याविना काढावे लागणार आहेत. अलिकडे ‘मजीप्रा’ची मुख्य जलवाहिनी नादुरुस्त होण्याचे आणि पाण्याचा स्रोत असलेल्या अप्पर वर्धा धरणावरील पंप हाऊसमध्ये विजेचा बिघाड निर्माण होण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रत्येक दुरुस्तीच्या वेळी पाणीपुरवठा बंद ठेवला जातो. भर उन्हाळ्याच्या दिवसातही असे वारंवार घडले. त्यामुळे अमरावतीकर कमालीचे नाराज झाले आहेत. ‘मजीप्रा’च्या देखभाल दुरुस्ती विभागाचे पुरेसे लक्ष नसल्याने हा प्रकार घडतो, असा नागरिकांचा आरोप आहे. यासंदर्भात काही राजकीय पक्ष व संघटनांनी ‘मजीप्रा’ कार्यालयावर धावा बोलून वेळोवेळी नाराजी व्यक्त केली आहे.

बातम्या आणखी आहेत...