आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड करामराठी, हिंदी, इंग्रजी अशा तिन्ही भाषेतील पत्रकारितेचे शिक्षण देणाऱ्या भारतीय जनसंचार संस्थेतील (आयआयएमसी) पाच पीजी डिप्लोमा अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे. शैक्षणिक सत्र २०२३-२४ साठी सुरु झालेल्या या प्रक्रियेत अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख १९ एप्रिल आहे. ऑनलाइन अर्ज राष्ट्रीय परीक्षा एजंसीच्या (एनटीए) अधिकृत वेबसाइट http://cuet.nta.nic.in वर उपलब्ध असल्याचे स्थानिक केंद्राने कळविले आहे.
आयआयएमसीमध्ये गेल्या वर्षीप्रमाणे यावर्षीही विद्यार्थ्यांना कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्टद्वारे (सीयूइटी-पीजी २०२३) प्रवेश मिळेल. इंग्रजी पत्रकारिता, हिंदी पत्रकारिता, जाहिरात आणि जनसंपर्क, रेडिओ आणि टेलिव्हिजन पत्रकारिता आणि डिजिटल मीडिया या विषयातील पीजी डिप्लोमाच्या प्रवेशासाठी विद्यार्थ्यांना ही प्रवेश परीक्षा देणे अनिवार्य आहे. प्रश्नपत्रिका हिंदी आणि इंग्रजी भाषेत असेल. मान्यताप्राप्त विद्यापीठातून कोणत्याही शाखेतील पदवी प्राप्त विद्यार्थी आयआयएमसीमध्ये प्रवेशासाठी अर्ज करू शकतात.
जे विद्यार्थी पदवीच्या अंतिम वर्षात किंवा सेमिस्टर परीक्षेत बसले आहेत किंवा जे विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, तेदेखील अर्ज करण्यास पात्र आहेत. निवड झाल्यावर, अशा विद्यार्थ्यांना त्यांच्या तात्पुरत्या मार्कशीटची किंवा प्रमाणपत्राची मूळ प्रत ३० सप्टेंबरपर्यंत सादर करावी लागेल, असेही कळविण्यात आले आहे.
राष्ट्रीय परीक्षा एजंसीच्या माहिती पुस्तिकेत, आयआयएमसीच्या अभ्यासक्रमांना 'सामान्य' श्रेणी अंतर्गत ठेवण्यात आले आहे. प्रश्नपत्रिका कोड सीओक्यूपी १७ असा आहे. संस्थानच्या विविध अभ्यासक्रमांचे चाचणी पेपर अनुक्रमांक १०४३ ते १०४७ वर आहेत. इच्छुक उमेदवारांनी प्रवेश परीक्षेशी संबंधित अद्ययावत माहितीसाठी एनटीए आणि आयआयएमसीच्या वेबसाइटला भेट देत रहावे, असा सल्लाही प्रवेश प्रभारी प्रो. राकेश गोस्वामी यांनी दिला आहे. प्रवेश प्रक्रियासंबंधी अधिक माहितीसाठी किंवा व्हॉट्सअॅपद्वारे माहिती मिळवायची असल्यास ७०१४५५१४१० या मोबाईल क्रमांकावर संदेश पाठवावा, असेही कळविण्यात आले आहे.
भाषिक पत्रकारितेसाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा
मराठी, ओरिया, मल्याळम आणि उर्दू पत्रकारितेच्या डिप्लोमा कोर्ससाठी स्वतंत्र प्रवेश परीक्षा आयोजित करण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमासाठीची सूचना लवकरच आयआयएमसीच्या अधिकृत वेबसाइट www.iimc.gov.in वर उपलब्ध होईल अशी माहितीसुद्धा प्रवेश प्रभारी प्रो. राकेश गोस्वामी यांनी दिली आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.