आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनमानी:अवैध वाळू उत्खननाचा शहानूर नदीपात्राला फास; प्रशासनाचे दुर्लक्ष ; खड्ड्यांना आले भुयाराचे स्वरुप

अंजनगाव सुर्जीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अवैध वाळू तस्करांनी जिल्ह्यात उच्छाद मांडला आहे. आपल्या स्वार्थासाठी इतर कुणाचा बळी जाईल यांचीही तमा त्यांना दिसत नाही. याची प्रचिती तालुक्यातील विहिगाव येथे गावालगत असलेल्या स्मशानभूमी परिसरातील शहानूर नदीपात्राकडे पाहिल्यानंतर येते. अवैध वाळू तस्करांनी शहानूर नदीपात्राला अवैध वाळू वाहतुकीचा फास आवळला असल्याचे दिसून येत आहे. मात्र याकडे महसूल विभागाच्या होत असलेल्या दुर्लक्षाबाबत नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तालुक्यातील सर्वात मोठे नदीपात्र असलेली शहानूर नदी ही विहिगाव परिसरातून जात असून गावातील स्मशानभूमीजवळ शहानूर नदीत मोठ्या प्रमाणात उत्खनन करून वाळू चोरटे अंधाराचा फायदा घेत रात्रीच्या वेळी त्याची उचल करतात. वाळू तस्करांनी अवैध उत्खननासाठी कोणतीही तमा न बाळगल्याने नदीपात्रात मोठमोठे खड्डे पडून त्याचे भुयार तयार झाले आहेत. हे खड्डे जीवघेणे ठरत असून पावसाळ्यात ते कुणाचा तरी बळी घेतल्याशिवाय राहणार नाही इतके धोकादायक ठरत आहेत. एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्खनन होऊन देखील महसूल व पोलिस प्रशासनाकडून त्यावर कोणतीच कारवाई हाेत नसल्याने नागरिकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. तक्रार आल्यास कारवाई करू : विहिगाव येथील तलाठी योगेश लंगडे यांना वाळू उत्खननाबाबत विचारणा केली असता, गावातील नागरिकांची या बाबत माझ्याकडे कुठलीही तक्रार आली नाही. त्यामुळे कारवाई केली नसल्याचे सांगत यासंबंधी गावकऱ्यांनी माहिती दिल्यास निश्चित कारवाई करू असे सांगितले.

नदीपात्रात खड्डे नव्हे, हे तर भुयार नदीपात्र वाळू उत्खनन केल्याने मोठे खड्डे पडून त्याला भुयाराचे स्वरूप आले आहे. पावसाळ्यात नदीला पूर आल्यानंतर मोठमोठे डोह तयार होतात. अशाच डोहामध्ये मागील वर्षी खोडगाव येथे नदीच्या पुरात पोहायला गेलेल्या दोन लहान मुलांचा डोहात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला होता.

झाडांची मुळं होताहेत कमजोर नदीपात्रात होणाऱ्या अवैध वाळू उत्खननाचे परिणाम नदीच्या किनाऱ्यावर असलेल्या झाडांवर होताना दिसून येत आहेत. या झाडांच्या मुळ्या मोकळ्या होत असल्याने झाडे कमजोर होऊन ती कोसळण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे पर्यावरणप्रेमींकडून संताप व्यक्त होत आहे.

बातम्या आणखी आहेत...