आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आकर्षक रोषणाई:‘विदर्भाच्या राजा’ची गुरुवारी निघणार विसर्जन मिरवणूक; गणेशभक्त सज्ज

अमरावती14 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

शहरासह विदर्भातील जनतेचे आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणाऱ्या न्यू आझाद गणेशोत्सव मंडळात विदर्भाच्या राजाची (बाप्पाची) वाजत-गाजत विसर्जन शोभायात्रा आयोजित करण्यात येते. कोरोनानंतर यंदा पहिल्यांदा गुरुवार, १५ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजता ‘विदर्भाच्या राजा’चे उत्साहात विसर्जन होणार आहे. यावेळी विदर्भाच्या ५ जिल्ह्यातील युवकांसह भाविकांची उपस्थिती राहणार आहे. यासोबतच ७ ढोल पथक आणि वारकरी दिंडी, ५ विविध प्रकारचे चित्ररथ या यात्रेत समावेश असेल, अशी माहिती न्यू आझाद गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष माजी नगरसेवक दिनेश बुब यांनी पत्रकार परिषदेत दिली.

स्थानिक खापर्डे बगीचा परिसरात असलेल्या ‘विदर्भाचा राजा’ मंडपात सोमवारी न्यू आझाद गणेशोत्सव मंडळातर्फे पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी दिनेश बुब म्हणाले की, दरवर्षीच्या परंपरेनुसार याही वर्षी बाप्पाच्या भव्य विसर्जन मिरवणुकीचे आयोजन करण्यात आले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही ‘विदर्भाच्या राजा’चे अनंत चतुर्दशी नंतर गुरुवारी विधिवत विसर्जन होणार आहे. गुरुवार १५ सप्टेंबर रोजी बाप्पाची विधिवत आरती व प्रसाद वाटप करून दुपारी ३ वाजता खापर्डे बगीचा मंडपातून विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होईल. विसर्जन मिरवणूक खापर्डे बगीचा येथून इर्विन चौक, मर्च्युरी पॉइंट, रेल्वे स्टेशन चौक, रेल्वे स्टेशन ब्रिज, राजकमल चौक, श्याम चौक, सिटी कोतवाली, जयस्तंभ चौक, वसंत टॉकीज, दीपक चौक मार्गे मोसीकॉल जिनिंग येथील राम लक्ष्मण संकुल येथे ‘विदर्भाच्या राजा’ची आरती करून नियमानुसार बाप्पाचे विसर्जन केले जाणार आहे.

यानिमित्त दरवर्षीप्रमाणे मिरवणुकीत सजावट, रांगोळ्या, केळीच्या पानांनी सजविलेल्या खांब, दिव्यांची सजावट करण्यात येणार आहे. व्यापारी वर्गाकडून विविध ठिकाणी गुलाल आणि फुलांची उधळण करून बाप्पाचे स्वागत करण्यात येणार आहे. कोरोना महामारीनंतर पहिल्यांदाच आयोजित करण्यात आलेल्या या शोभायात्रेचे थेट प्रक्षेपण प्रसार माध्यमांवर केले जाणार आहे. त्यामुळे वृद्ध आणि लहान मुले, महिलांना घरी बसल्या बाप्पाचे दर्शन घेता येणार आहे. यावेळी बाप्पाच्या दर्शनासाठी तसेच मिरवणुकीत विदर्भातील ४ ते ५ जिल्ह्यांतून भाविकांची उपस्थिती असणार आहे. त्यासाठी पोलिस आणि महापालिका प्रशासनाशी चर्चा सुरू आहे. हवामान खात्याचा इशारा लक्षात घेऊन पावसाच्या दृष्टीने मिरवणुकी दरम्यान पुरेसे नियोजन करण्यात येणार आहे. विसर्जन मिरवणूक उत्साहामध्ये परंपरागत पद्धतिने काढण्यात येईल असे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. यावेळी राजू शर्मा पत्रकार परिषदेला उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...