आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मारहाण:वीज कर्मचाऱ्याला मारहाण करणाऱ्या आरोपीस कारावास

अमरावती3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

वीज बील वसुली करणाऱ्या कर्मचाऱ्याला मारहाण केल्या प्रकरणातील आरोपीला न्यायालयाने तीन वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली. गणेश बळीराम तळोकार (५२, रा. विश्वनाथ कॉलनी, अमरावती) असे शिक्षा झालेल्या आरोपीचे नाव आहे. ही घटना १० ऑक्टोबर २०१८ रोजी राजापेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील फरशी स्टॉप स्थित टांक बाजार परिसरात घडली होती.

१० ऑक्टोबर २०१८ रोजी राजापेठ स्थित वीज वितरण कंपनीच्या कार्यालयातील वरीष्ठ तंत्रज्ञ गोपाल काशीराम माहुलकर हे थकीत वीज बिलाची वसुलीचे काम करीत होते. दरम्यान ते टांक बाजार येथे प्रकाश बळीराम तळोकार यांच्या दुकानात वसुलीकरता गेले असता, तेथे उपस्थित प्रकाश तळोकार यांचा भाऊ आरोपी गणेश तळोकार यांस ‘तुम्ही वीज बिल भरले नाही तर तुमचे वीज कनेक्शन बंद करण्यात येईल’ असे त्यांनी म्हटले. त्यावेळी गणेश तळोकार यांनी वाद घालून गोपाल माहुलकर यांना अश्लील शिविगाळ केली आणि लोखंडी पाइपने मारण्याचा प्रयत्न केला. तसेच त्यानंतर त्याने माहुलकर यांना थापड मारुन त्याची कॉलर पकडली. घटनेनंतर माहुलकर हे जखमी झाले.

घटनेची तक्रार राजापेठ पोलिस ठाण्यात दिल्यानंतर पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्ह्याची नोंद केली. तपासाअंती तपासी अधिकारी पीएसआय दत्ता नरवाडे यांनी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी वकील रणजीत भेटाळू यांनी न्यायालयात एकुण सात साक्षीदार तपासले.

दोन्ही पक्षाच्या युक्तिवादानंतर जिल्हा व सत्र न्यायाधीश (क्रमांक ३) रवींद्र व्ही. ताम्हाणेकर यांच्या न्यायालयाने आरोपीला भादंविच्या कलम ३५६ नुसार २ वर्षे सश्रम कारावास व २ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास तसेच कलम ३३२ नुसार ३ वर्षे सश्रम कारावास व ३ हजार रुपये दंड व दंड न भरल्यास दोन महिने अतिरिक्त कारावास व कलम १८६ नुसार ३ महिने सश्रम कारावास व ५०० रुपये दंड व दंड न भरल्यास सात दिवस अतिरिक्त कारावासाची शिक्षा ठोठावली. सदर प्रकरणात पैरवी अधिकारी म्हणून पोलिस हवालदार बाबाराव मेश्राम व एनपीसी अरुण एम. हटवार, सतीश चौधरी यांनी पोलिस विभागाकडून कामकाज पाहिले.

बातम्या आणखी आहेत...