आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

महिलांची कुचंबणा:आठ लाख लोकसंख्येच्या शहरात महिलांसाठी केवळ 10 प्रसाधनगृहे ; महापालिकेकडे निधी असूनही प्रसाधनगृहासाठी जमीनच मिळेना

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

जागेअभावी मनपा क्षेत्रातील २६ पैकी केवळ १० महिला प्रसाधनगृहं पूर्ण झाली आहेत. मनपाकडे निधीचा अभाव नाही. महिला प्रसाधनगृहासाठी १५ ते ४० लाखाची (जागा व सीट्सच्या संख्येनुसार) तरतूद आहे. परंतु, मोक्याच्या तसेच गर्दीच्या ठिकाणांवर असलेल्या खासगी संस्थांच्या तसेच शासकीय जागा वारंवार पत्रव्यवहार केल्यानंतरही उपलब्ध करून दिल्या जात नसल्याने १६ प्रसाधनगृहांचे काम रखडले आहे. त्यामुळे अनेक ठिकाणी महिलांची कुचंबणा सहन करावी लागत आहे. शहराचे प्रवेशद्वार असलेल्या वेलकम पॉइंटजवळ नागपूर, पुणे, औरंगाबाद, अकोला या शहरांकडे खासगी ट्रॅव्हल्सने महिला, युवती, मुलींना प्रवास करावा लागतो. दररोज सुमारे ५०० महिला येथून जाणे-येणे करतात. त्यामुळे मनपाला महिलांसाठी या ठिकाणी स्मार्ट प्रसाधनगृह उभारायचे आहे. परंतु, तेथील जमीन ही श्री शिवाजी शिक्षण संस्थेच्या मालकीची असून, तेथे डेअरी आहे. त्यामुळे त्यांनी नियमानुसार जागा देता येणार नाही, असे मनपाला कळवले आहे. सोबतच जवळच असलेली शासकीय जागा मिळविता आली तर बघावे, असा सल्लाही दिला. मनपाने पत्र व्यवहारही केला. परंतु, अद्याप गाडी पुढे सरकली नाही. परिणामी वेलकम पॉइंट येथे महिलांचे प्रसाधनगृह तयार होऊ शकले नाही. प्रसाधनगृहासाठी ३० गुणिले ५० अर्थात १५०० चौरस फुट जागेची आवश्यकता आहे. पर्याय म्हणून वेलकम पॉइंट चौकातीलच महावितरणच्या पाॅवर हाऊसकडेही मनपाद्वारे मागणी करण्यात आली. त्यांनीही जागा देण्यात तांत्रिक अडचण असल्याचे सांगितले. मुंबई कार्यालयाकडे पत्रव्यवहार करून जागा मागावी लागेल, अशी सबब सांगितली. येथूनही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नाही. गर्दीच्या ठिकाणी महिलांची कुचंबणा होऊ नये म्हणून मनपाने महिलांसाठी २६ स्मार्ट प्रसाधनगृहे उभारण्याचा निर्णय घेतला. परंतु, जागेची अडचण असल्यामुळे अजूनही १६ प्रसाधनगृहे कागदावरच आहेत.

बातम्या आणखी आहेत...