आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

चांदूर तालुक्यात 27 गावांमध्ये एक गाव-एक गणपती:250 ठिकाणी सार्वजनिक बाप्पा, मुर्तींच्या किंमतीत पाच पटीने वाढ

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

कोरोनामुळे गेली दोन वर्षे सार्वजनिक गणेशोत्सवाला बंदी होती. परंतु यावर्षी निर्बंध नसल्यामुळे तालुक्यात सुमारे 250 ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जात असून 27 गावांमध्ये एक गाव-एक गणपती अशी किमया साकारण्यात आली आहे. दरम्यान मूर्तीच्या किंमतीत पाचपट वाढ झाली असली तरी भक्तांचा उत्साह कायम आहे.

सध्या घरगुती गणेशमूर्ती 250 रूपयांपासून ते एक हजार रुपयांपर्यंत विक्रीस उपलब्ध आहे. कोरोनाआधी याच मूर्ती 50 ते 250 रूपयांपर्यंत उपलबध होत्या. मूर्त्यांची किंमत सरासरी पाच पट वाढल्याने यावर्षी बाजारात फक्त 41 दुकानेच आहेत. कोरोना अगोदर हीच संख्या 72 इतकी होती. पोलिस विभागाकडे झालेल्या नोंदीनुसार तालुक्यातील चांदूरबाजार पोलिस स्टेशन अंतर्गत एकूण 73 सार्वजनिक बाप्पा विराजमान होणार आहेत.

14 गावात एक गाव एक गणपती

चांदूरबाजार शहरात 18 तर ग्रामीण भागात 55 बाप्पांची सार्वजनिकरित्या स्थापना होणार आहे. राजुरा, चिंचोली काळें, वाठोंडा, बेसखेडा, जालनापूर, थुगांव, माधान, काजळी, नानोरी, पिंपळखुटा, दिलालपूर, पिली, जसापूर, सर्फाबाद 14 गावात एक गाव एक गणपती ही संकल्पना साकारण्यात आली आहे. याशिवाय तालुक्यातील शिरजगांव कसबा पोलिस स्टेशन अंतर्गत एकूण 58 सार्वजनिक बाप्पा विराजमान होणार आहे.

31 सार्वजनिक बाप्पा

यात दोन गांवात एक गाव-एक गणपती असणार आहे. या पोलिस स्टेशन अंतर्गत पांढरी व कल्होडी येथे ही संकल्पना प्रत्यक्ष नावारुपाला आली आहे. ब्राम्हणवाडा थडी पोलिस स्टेशन अंतर्गत एकूण 31 सार्वजनिक बाप्पा विराजमान होणार आहे. त्यापैकी चकूम, सुरळी, वणी, गौरखेडा, कुरणखेड, विश्रोळी, सांगोला या सात गावात एक गाव-एक गणपती आहे.

घरोघरी गणरायाचे आगमन

तर तिकडे आसेगांव पोलिस स्टेशन अंतर्गत एकूण आठ सार्वजनिक बाप्पा विराजमान होणार असून आसेगावमध्ये चार ठिकाणी सार्वजनिक बाप्पा विराजमान झाले आहेत. तर दहिगांव, लसणापूर, विरुळ पुर्णा, टाकरखेडा पूर्णा या चार गावात एक गाव एक गणपती आहे. सार्वजनिक गणेत्सवासोबतच तालुक्यात घरोघरी गणरायाचे आगमन झाले आहे.

सनई, चौघड्यांचा निनाद

सर्वच ठिकाणी, जय्यत तयारीही झाली आहे. स्थापनेच्या दिवशी सर्वदूर सनई, चौघड्यांचा निनाद व आरतीच्या आवाजाने वातावरण भक्तीमय, मंगलमय व प्रसन्न झाले होते. कोरोनामुळे दोन वर्षानंतर भक्तांचा ऊत्साह ओसंडून वाहत असला तरी महागाईच्या माराने नागरिक त्रस्त आहेत. सजावटीच्या सामान तर महागलेच परंतू बाप्पाच्या मुर्तींच्याही किंमतीत भरमसाठ वाढ झाली आहे.

बातम्या आणखी आहेत...