आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिवृष्टी:नांदगाव तालुक्यामध्ये 17 हजार 977 हेक्टरमधील पिकाला अतिवृष्टीचा फटका

नांदगाव खंडश्वर10 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

यावर्षी जूनमधे पावसाने उघडीप दिली. याउलट जुलैमध्ये संततधार व अतिवृष्टी झाली. या अतिवृष्टीचा फटका नांदगाव तालुक्यालासुद्धा बसला असून कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार तालुक्यातील १७ हजार ९७७ हेक्टर मधील पिके अतिवृष्टीने बाधित झाली असून, शेतकऱ्यांवर नैसर्गिक आपत्ती ओढवली आहे.

जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे तालुक्यालीन नदी नाल्याकाठच्या शेतातील पिके पुरामुळे खरडून गेली. तर, काही शेतामधे अजूनही पाणी साचून असल्याने पिके सड‌ली. अतिवृष्टिचा सर्वात जास्त फटका तूर पिकास बसला असून, ७० टक्के क्षेत्रातील तुरीचे पिक वाहून गेले. सततच्या पावसाने शेतातील पिकांची वाढ खुंटलेली असुन निंदन, डवरणी होत नसल्याने पिकात तणाचे प्रमाण वाढले आहे. दुसरीकडे निंदण करण्यास मजूर मिळत नाही आणि मजुरीचे दर वाढल्याने शेतकरी तणनाशकास प्राधान्य देत असून, काही शेतकरी तणनाशकाची पिकामधे डबल फवारणी करीत आहेत. जुलै महिन्यातील सततच्या पावसामुळे काही शेतात शेततळे निर्माण झाले. जमिनी ओल्याच असल्याने डवरणीची कामेही खोळंबली. त्यामुळे शेतकरी मेटाकुटीस आला आहे.

तूर, सोयाबीन, कपाशीच्या पिकाचे मोठे नुकसान
तालुका कृषी विभागाच्या प्राथमिक अहवालानुसार नांदगाव खंडेश्वर तालुक्यात जुलै महिन्यात झालेल्या अतिवृष्टीने बाधित झालेले पीकनिहाय क्षेत्र सोयाबीन १३ हजार ४२६ हेक्टर तर तूर २ हजार ५५० हेक्टर, कापूस २ हजार १ हेक्टर असे एकूण बाधित क्षेत्र १७ हजार ९७७ हेक्टरवर पोहोचले आहे. शासनाने तातडीने मदत द्यावी, अशी मागणी पुढे आली आहे.