आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराबीडीओंच्या दिशेने पाण्याची बाटली, माइक फेकल्याप्रकरणी मोर्शीचे आमदार देवेंद्र भुयार यांना जिल्हा न्यायाधीश एस. एस. अडकर यांच्या न्यायालयाने आज 3 महिन्यांची शिक्षा व 15 हजार रुपयांचा दंड ठोठावला. जिल्हा परिषदेच्या सभागृहात तीन वर्षांपूर्वी आयोजित पाणी टंचाईच्या विशेष सभेत तत्कालीन जि. प. सदस्य व विद्यमान आमदार देवेंद्र भुयार यांनी वरुडच्या तत्कालीन बीडीओंच्या दिशेने पाण्याची बाटली व माइक फेकला होता.
प्रकरण नेमके काय?
विद्यमान आमदार भुयार हे 2019 मध्ये जिल्हा परिषद सदस्य होते. त्यांच्या सर्कलमधील पाणी टंचाईच्या मुद्दयावर ते 28 मे 2019 ला जिल्हा परिषदेमध्ये आयोजित विशेष सभेत बोलत होते. याच मुद्दयावर वरुड पंचायत समितीचे तत्कालीन बीडीओ सुभाष बोपटे हे उभे राहून माहिती देत होते. मात्र, सदर माहिती खोटी असल्याचा आरोप करून भुयार यांनी बैठकीतच बोपटे यांच्या दिशेने पाण्याची बाटली व माइक फेकला होता.
शासकीय कामात अडथळा
भुयार यांच्या या प्रकाराने सभागृहात भीतीचे वातावरण तयार झाले होते. घटना घडली त्यावेळी जिल्हा परिषदेच्या तत्कालीन सीईओ मनीषा खत्री व इतर अधिकारी आणि पदाधिकारी सभागृहात हजर होते. या प्रकारानंतर तत्कालीन सीईओ खत्री यांनी भुयार यांच्याविरुद्ध गाडगेनगर पोलिसात तक्रार दिली. त्यावरून पोलिसांनी भुयार यांच्याविरुद्ध शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला होता.
एकही साक्षीदार फितूर नाही...
या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले. प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान शासकीय पक्षाकडून अॅड. रणजित भेटाळू यांनी सात साक्षीदारांच्या साक्ष तपासल्या. यावेळी सुभाष बोपटे यांची साक्ष महत्वाची ठरली. तसेच एकही साक्षीदार फितूर झाला नाही. या प्रकरणात न्यायालयात आमदार भुयार यांच्याविरुध्द दोष सिध्द झाल्यामुळे न्यायालयाने तीन महिन्यांचा साधा कारावास तसेच 15 हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. दंड न भरल्यास एक महिना अतिरिक्त कारावासाची शिक्षा दिली.
उच्च न्यायालयात जाणार
निकालानंतर आमदार देवेंद्र भुयार म्हणाले की, माझ्या सर्कलमधील ग्रामस्थांना पिण्यासाठी पाणी मिळत नव्हते. त्यामुळे मी विशेष सभेत प्रश्न विचारले. त्यावर बीडीओंनी सभागृहात खोटी माहिती सभागृहात दिली. त्यावेळी मी बीडीओंना विरोध केला. यावेळी माझा धक्का लागून बॉटल खाली पडली, पण मी बॉटल किंवा माइक फेकला नाही. माझ्याविरुद्ध खोटा आरोप करून गुन्हा दाखल केला होता. दरम्यान आज न्यायालयाने दिलेल्या निकालाविरुद्ध आम्ही उद्याच हायकोर्टात अपील करणार आहोत. तसेच माझ्या जनतेसाठी कितीही गुन्हे दाखल झाले, तरी आम्ही अधिकाऱ्यांना जाब विचारू जनतेला न्याय मिळवून देऊ, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.