आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराजिल्ह्यातील ४०.८ टक्के पुरुष व ९ टक्के स्त्रिया तंबाखूजन्य पदार्थ चघळतात, अशी माहिती राष्ट्रीय कुटुंब आरोग्य सर्वेक्षणातून उजेडात आली आहे. हे अत्यंत चिंताजनक वास्तव आहे. तंबाखूजन्य पदार्थांची अवैध विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाया करतानाच विविध माध्यमांद्वारे प्रभावी जनजागृती करावी, असे निर्देश जि. प. मुख्य कार्यकारी अधिकारी अविश्यांत पंडा यांनी गुरुवार १६ रोजी दिले. राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम जिल्हा समितीच्या बैठकीला जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रमोद निरवणे, अतिरिक्त डीएचओ डॉ. रेवती साबळे, सहायक पोलिस आयुक्त प्रशांत राजे, पोलिस उपअधीक्षक दिलीप सूर्यवंशी, डॉ. मुकुंद गुर्जर, उद्धव जुकरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.जगातील मौखिक कर्क रुग्णांपैकी ५० टक्क्यांहून अधिक रुग्ण केवळ भारतात आढळतात. मौखिक कर्करोगाचे मुख्य कारण तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ चघळणे हेच आहे. जागतिक युवा तंबाखू सर्वेक्षणानुसार (जीवायटीएस) भारतात दररोज साडेपाच हजार व राज्यात रोज ५३० मुले तंबाखूच्या व्यसनात अडकत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेने याला ‘जागतिक आपत्ती’ घोषित केली आहे.
जिल्ह्यातील तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनाची आकडेवारी चिंताजनक आहे. तंबाखू नियंत्रणासाठी जिल्ह्यात राबवण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची परिणामकारकता तपासावी व अंमलबजावणी प्रभावी होण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावेत. नागरिकांमध्ये विशेषत: युवक, विद्यार्थ्यांपर्यंत व्यसनाधीनतेच्या दुष्परिणामांबाबत माहिती संवाद, व्हिडिओ, सोशल मीडिया, पत्रके अशा विविध माध्यमांतून पोहोचवावी. जनजागृती कार्यक्रमांत सातत्य असावे. जिल्ह्यात ८६ शाळा तंबाखूमुक्त घोषित करण्यात आल्या आहेत. याबाबतच्या निकषांचे अद्यापही पालन होते किंवा कसे, याची वेळोवेळी तपासणी करणे आवश्यक आहे, असे निर्देश पंडा यांनी दिले.
जिल्ह्यातील सर्व शाळांमध्ये व शासकीय कार्यालयांत तंबाखूविरोधी जनजागृती करावी. तंबाखू नियंत्रण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करावी. सर्व कार्यालये तंबाखूमुक्त करण्यासाठी प्रयत्न करावेत, असेही निर्देश त्यांनी दिले.
जिल्ह्यात तंबाखूजन्य पदार्थविरोधी २८ कारवाया
अन्न व औषध प्रशासनातर्फे एप्रिल २०२१ ते मे २०२२ या काळात २८ प्रकरणी कारवाई करून ९२ लक्ष ७१ हजार ३६८ रु. रकमेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दंडात्मक कारवायांत ७९ हजार २८० रु. रक्कम प्राप्त झाली, अशी माहिती डॉ. गुर्जर यांनी दिली. तंबाखू मुक्तीसाठी गतवर्षी ९ हजार १३३ व्यक्तींना मार्गदर्शन करण्यात आले. त्याचप्रमाणे, १४ कार्यशाळा व ५८ गटचर्चा घेण्यात आल्या, असे जुकरे यांनी सांगितले. डेंग्यू व मलेरिया नियंत्रणाबाबतही बैठकीत आढावा घेण्यात आला.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.