आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

निकालाची प्रतीक्षा:जिल्ह्यात ग्रा. पं. निवडणुकीसाठी शांततेत मतदान; दुपारनंतर मतदारांमध्ये उत्साह

अमरावती2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

जिल्ह्यात २५७ ग्रामपंचायतींसाठी सार्वत्रिक निवडणूक रविवारी शांततेत पार पडली. दर्यापूर तालुक्यातील महिमापूर येथील ईव्हीएम यंत्रात तांत्रिक बिघाड झाला होता. मात्र नंतर निवडणूक प्रक्रिया सुरळीत पडली. मतदारांना आकर्षित करण्यासाठी धारणी तालुक्यातील दाबिदा येथे महिला मतदान केंद्र उभारण्यात आले होते. दुपारनंतर बहुतेक सर्व केंद्रांवर मतदारांनी मतदानासाठी गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळाले.

स्थानिक स्वराज्य संस्थेतील ग्रामपंचायत हा केंद्रबिंदू असून ग्रामीण भागाचा विकास करण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावते. रविवारी सकाळच्या सत्रात जिल्ह्यामध्ये बहुतेक मतदान केंद्रांवर मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. दरम्यान दुपारनंतर मतदारांनी घराबाहेर पडत उत्साह दाखवल्याने टक्केवारीत वाढ होत गेली. नागरिकांना मतदान करताना त्रास होणार नाही याची काळजी घेत प्रशासनाने चोखपणे कर्तव्य पार पाडले. मतदार यादीतील क्रमांक शोधून देण्यासाठी मतदान केंद्राच्या ठरवून दिलेल्या सीमा रेषेबाहेर बहुतेक ठिकाणी पेंडॉल टाकले होते. कार्यकर्ते आलेल्या मतदारांना चिठ्ठीवर क्रमांक लिहून देत होते. वयोवृद्धांना गाडीतून केंद्रापर्यंत पोहाेचवण्यासाठी विविध पॅनलच्या कार्यकर्त्यांची दिवसभर धडपड दिसून आली. प्रत्येक मतदान केंद्रावर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता. सरपंचाची निवड थेट जनतेतून होणार असल्याने सरपंच पदासाठी रिंगणात असलेल्या उमेदवारांसह सदस्य पदासाठी निवडणुकीचा आखाडा लढवणाऱ्या उमेदवारांचे भाग्य मतदारांनी मतदान यंत्रात कैद केले असून विजयाची माळ कुणाच्या गळ्यात पडणार याचा फैसला मंगळवार, २० डिसेंबरला मत मोजणीअंती होणार असल्याने आता सर्वांचे लक्ष मत मेाजणीकडे लागले आहे.

नांदगाव खंडेश्वर : ७५.०४%
नांदगाव खंडेश्वर तालुक्यात १६ ग्रा. पं.साठी मतदान ४८ केंद्रावर मतदान झाले असून, दुपारी साडे तीन वाजेपर्यंत ८२५५ पुरुष व ७४१३ महिला अशा एकूण १५६६८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. एकूण ७५.०४ टक्के मतदान झाले.

मोर्शी : ७८ केंद्रांवर मतदान
मोर्शी तालुक्यात २३ ग्रा. पं.साठी ७८ केंद्रावर मतदान झाले. दुपारी साडेतीन वाजेपर्यंत ३१०४२ मतदारांपैकी १९७८९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता. तोपर्यंत ६३.७४ टक्के मतदान झाले. सकाळी पहिल्या तासात फक्त १०.५५ टक्केच मतदान झाले होते.

धारणी : महिला मतदान केंद्र ठरले आकर्षण
धारणी तालुक्यातील दाबिदा येथील महिला मतदान केंद्र हे आकर्षणाचे केंद्रबिंदू ठरले. या केंद्राची उभारणी धारणीचे तहसीलदार व निवडणूक अधिकारी प्रदीप शेवाळे यांच्या मार्गदर्शनात केली होती. आकर्षक सजावट, सेल्फी पॉइंट, अभिप्राय व सिग्नेचर पॉइंट मतदारांचे आकर्षण ठरले.

धामणगाव रेल्वे तालुक्यात शांततेत मतदान
धामणगाव तालुक्यात ७ ग्रा. पं. साठी २१ केंद्रावर एकूण ३१५४ पुरुष व २७५६ महिला मतदारांनी शांततेत मतदानाचा हक्क बजावला. तालुक्यात एकूण ८४.८६ टक्के मतदान झाले..

दर्यापूर: इव्हीएममध्ये बिघाड
दर्यापूर तालुक्यातील २४ ग्रा. पं.साठी मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. महिमापूर येथील मतदान केंद्रावरील इव्हीएम यंत्रातील थोडा तांत्रिक बंदचा प्रकार वगळता मतदान सर्वत्र शांततेत पर पडले. सकाळच्या सत्रात मतदारांमध्ये निरुत्साह दिसून आला. दरम्यान दुपारनंतर मतदारांनी घराबाहेर पडत उत्साह दाखवल्याने टक्केवारीत वाढ होत गेली.

तिवसा : १२ ग्रा. पं.चे मतदान
तिवसा तालुक्यात १२ ग्रा. पं.साठी ३६ केंद्राद्वारे मतदान शांततेत पार पडले. दुपारी ४ वाजेपर्यंत ७२७५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, सरपंच पदासाठी रिंगणात असलेल्या ४२ उमेदवारांचे भाग्य पेटीत बंद झाले आहे. १६१ कर्मचाऱ्यांनी निवडणूक कर्तव्य बजावले.

अंजनगाव सुर्जी : ८४.८४ %
अंजनगाव तालुक्यात १३ ग्रामपंचायतींसाठी ३९ केंद्रांवर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. चिंचोली बु., चिचोली खुर्द, सोनगाव, हस्नापूर पार्डी, हिरापूर, जवर्डी, बोराळा, हंतोडा, हिंगणी, हुसेनपूर खोडगाव, शेलगाव, खिरगव्हाण, मलकापूर बु. येथील केंद्रांवर निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली.

चांदूर बाजारमध्ये ८६ केंद्र
चांदूर बाजार तालुक्यातील २४ ग्रा. पं. साठी ८६ केंद्रांवर मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. दुपारी दीड वाजेपर्यंत ४४.५० टक्के मतदान झाले होते. दुपारनंतर मतदारांची मतदान केंद्रावर गर्दी दिसून आली. तोपर्यंत एका तृतियपंथीसह ८८६१ पुरुष व ७७९६ महिलांनी मतदारांनी मतदान केले

अचलपूर : ८२.३१ % मतदान
अचलपूर तालुक्यात २३ ग्रामपंचायतींसाठी मतदानाची प्रक्रिया पार पडली. मतदान प्रक्रियेच्या शेवटच्या क्षणापर्यंत २५ हजार ७१९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावत निवडणुकीच्या रिंगणात असलेल्या उमेदवारांचे भाग्य मतदान यंत्रात कैद केले. एकूण ८२.३१ टक्के मतदान झाले.

बातम्या आणखी आहेत...