आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराशहरातील विविध प्रलंबित प्रश्नांवर सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय अमरावती येथे जय संविधान संघटनेचे समन्वयक किरण गुडधे यांनी बेमुदत उपोषण सुरु केले आहे. जिल्हा प्रशासनाकडे वेळोवेळी लिखित स्वरुपात निवेदन देऊनही प्रशासन जनतेप्रती संवेदनशील नसल्याचा आरोप गुडधे यांनी यावेळी केला. कोरोना काळात एक्झॉन, महावीर, गेट लाईट, बख्तार, बेस्ट, झेनिथ या खासगी कोविड हॉस्पिटलचे मुख्य लेखा परीक्षक मनपा अमरावती यांच्या पथकाने ऑडिट केले होते. नियमबाह्य पद्धतीने २ हजार ६७५ कोविड रुग्णांकडून १ कोटी ३० लाख रुपये जादा घेतल्याचे यातून सिद्ध झाले.
ही रक्कम अजूनही रुग्णांना परत करण्यात आली नाही. अनेकवेळा मनपा आयुक्त व जिल्हाधिकारी यांनी ही बाब पत्राद्वारे निदर्शनास आणून दिली. मात्र, यावर कोणतीही कारवाई प्रशासनाने केली नाही. यात मोठ्या प्रमाणात घोळ करण्यात आल्याचे किरण गुडधे यांचे म्हणणे आहे. तसेच कमलसुख विहार सहकारी गृहनिर्माण संस्था म. अमरावती या संस्थेच्या माध्यमातून झालेले सर्व भूखंड विक्री, गहाणखत व हस्तांतरण व्यवहार जिल्हाधिकारी यांची पूर्वपरवानगी न घेता शासनाची दिशाभूल करून कोट्यवधी रुपयांचा आर्थिक गैरकारभार करणाऱ्यांवर कारवाई केली नाही.
गतवर्षी आरोग्य उपसंचालक डॉ. वारे यांना अकोला येथे जाऊन जिल्हा स्त्री रुग्णालय (डफरिन) व जिल्हा सामान्य रुग्णालय (इर्विन) अमरावती येथे लोकसंख्येच्या प्रमाणात त्वरित मनुष्यबळ पुरवठा करण्याचे पत्र दिले. परंतु, आजवर यावर कोणतीही कारवाई केली नाही. मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे अनेक रुग्णांना योग्य उपचार न मिळाल्याने रुग्ण दगावल्याच्या घटना घडलेल्या आहेत.
आरोग्य प्रशासन मुबलक प्रमाणात मनुष्यबळ पुरवठा उपलब्ध करून देण्यात आला नसल्याचा आरोप जय संविधानने केला आहे. प्रलंबित मागण्यांच्या पूर्ततेसाठी सोमवारपासून जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात बेमुदत उपोषण सुरू केले आहे. यावेळी उपोषणात किरण गुडधे, हरिश मेश्राम, नारायण थोरात, मो. शफी सौदागर, गोपाल ढेकेकर, सुनील गायकवाड, संकेत राहुळ, सतीश गजभिये, राजा गडलिंग, रवींद्र फुले, धर्मा शेंडे, रितीक डिडिए, छगन मुनेश्वर, वंश मुन, विवेक हिवराळे, परमेश्वर वरठे, प्रवीण गाढवे, राजू थोरात, संजय वानखेडे, नरेंद्र कठाणे आदी सहभागी झाले आहे.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.