आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आता मे‌ळघाटसाठी अमरावतीत स्वतंत्र रुग्णवाहिका:रुग्णाची गैरसोय टळणार, मृत रुग्णांना ने-आण करण्याची सोय

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

मेळघाटातील रुग्णांची गैरसोय टळावी म्हणून जिल्हा प्रशासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला असून त्यानुसार आता कुणालाही गावापर्यंत ये-जा करण्यासाठी बहुधा एसटी किंवा इतर खासगी वाहनाने प्रवास करावा लागणार नाही. त्यांच्यासाठी येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात एक स्वतंत्र रुग्णवाहिका उपलब्ध करुन दिली जाणार असून ती केवळ मेळघाटातील रुग्णांसाठीच वापरली जाणार आहे.

उपचारासाठी नागपुर येथे पाठविण्यात (रेफर) आलेल्या एका लहानग्या रुग्णाला तो तेथे मृत झाल्यानंतर त्याच्या पालकाने चक्क एसटी बसने परत आणले होते. या प्रकरणाची पुनरावृत्ती होऊ नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. अर्थात मेळघाटहून अमरावतीत आणल्या गेलेल्या एखाद्या रुग्णाला उच्चस्तरीय उपचारासाठी नागपुरात रेफर करण्यात आले असेल आणि उपचारादरम्यान त्या रुग्णाचा जर मृत्यू ओढवला असेल तर तीच रुग्णवाहिका शववाहिकेसारखी काम करेल, असेही जिल्हा प्रशासनाचे म्हणणे आहे.

प्रशासनाने मेळघाटातील आरोग्य सेवेला प्राधान्य दिले असले तरी काही ठिकाणी डॉक्टर्स आणि औषधीचा तुटवडा आहे, हे वास्तव आहे. अशा स्थितीत गुंतागुंतीचे आजारपण असलेल्या रुग्णांना पुढील उपचारासाठी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात रेफर केले जाते. दरम्यान सदर रुग्णाचा आजार येथेही बरा होण्याजोगा नसेल तर त्या रुग्णाला पुढे नागपुर येथे उपचारासाठी पाठविले जाते.

अशा स्थितीत त्या रुग्णाची आबाळ होऊ नये. त्यांना नेमक्या वेळेत तेथे पोचता यावे, यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिका तैनात ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी बजावले आहे. त्या आदेशानुरुप जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांनीही तत्काळ एक सूचना जारी करुन जिल्हा शल्य चिकित्सकांना तसे कळविले आहे. त्यांच्यामते सदर रुग्णवाहिकेसाठीचा खर्च राष्ट्रीय आरोग्य मिशनमधून करावयाचा असल्याने त्यासाठी वेगळ्या निधीची तरतूद करावी लागणार नाही. शिवाय एनएचएमचा निधी बहुदा नेहमीच उपलब्ध असतो, त्यामुळे रुग्णवाहिकेची चाकेही कधी थांबण्याची भीती नाही.

… म्हणून ही व्यवस्था केली

मेळघाटात आदिवासीबहुल नागरिक राहतात. त्यांची आर्थिक स्थिती अत्यंत नाजूक असते. मुळात रुग्णांचा उपचार आणि त्यांची ने-आण यासाठी सरकारच्या अनेक योजना आहेत. त्यासाठीचा खर्चही सरकारी तिजोरीतूनच केला जातो. मात्र तरीही गेल्या काही दिवसांपूर्वी मृत रुग्ण बालकाला एसटी बसने परत आणण्याचा दुर्दैवी प्रसंग त्याच्या पालकांवर ओढवला. असा प्रसंग आणखी कुणावरही ओढवू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. - पवनीत कौर, जिल्हाधिकारी, अमरावती.

बातम्या आणखी आहेत...