आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

संभ्रम:सोयाबीनचे भाव स्थिरावल्यामुळे बाजारपेठेतील आवक मंदावली

अकोला2 महिन्यांपूर्वी
  • कॉपी लिंक

किरकोळ चढउतार वगळता सोयाबीनचे भाव एकाच जागी स्थिरावल्याने बाजारपेठेतील आवक कमी झाली आहे. त्यामुळे सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे.‌ खरेदीच्या मुहूर्तापासून भाववाढीची प्रतीक्षा करत शेतकऱ्यांनी सोयाबीन साठवून ठेवले आहे. मात्र ज्यांना रब्बीच्या पेरणीसाठी पैशांची गरज आहे. किंवा माल साठवणुकीला जागा नाही अशाच शेतकऱ्यांनी मिळेल त्या भावात विक्री केली आहे.

यंदा २७ ऑक्टोबरपासून अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीन खरेदीचा प्रारंभ झाला. पहिल्या दिवसापासून आतापर्यंत सरासरी भाव हा सहा हजारांच्या पुढे गेला नाही. ९ नोव्हेंबरला एकदाच जास्तीत जास्त भाव ६१०० मिळाला त्यानंतर भाव स्थिरावले. २४ नोव्हेंबरपर्यंत सरासरी भाव हे साडेपाच हजार रुपये प्रतिक्विंटलच्या जवळपास होते. त्यानंतर घसरण, किरकोळ चढउतार वगळता भाव स्थिरावले आहेत. गत आठवडाभरातील स्थिती पाहता सरासरी भाव ५ हजार ते ५ हजार ३०० रुपये एवढा मिळाला. त्यामुळे निव्वळ गरजेपोटी शेतकरी सोयाबीन बाजारात आणत आहेत. शनिवार, ३ डिसेंबरला अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये २ हजार ८८७ क्विंटल सोयाबीनची आवक झाली.

कमीत कमी ४६००, जास्तीत जास्त ५३८५ तर सरासरी ५२०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. जिल्ह्यात अतिवृष्टी, परतीच्या पावसाने सोयाबीनचे नुकसान झाले असले, तरी अनेकांना भरपूर उत्पादनही झाले. मात्र सोयाबीनचा उत्पादन खर्च आणि मिळणारा भाव याचा ताळमेळ बसत नसल्याने सोयाबीन विकावे की ठेवावे याचा संभ्रम शेतकऱ्यांमध्ये दिसत आहे. सात हजारांवर भाव मिळावा, अशी शेतकऱ्यांना अपेक्षा आहे.

१ लाख ६१ हजार क्विंटल आवक या वर्षी ऑक्टोबरपासून ते ३ डिसेंबरपर्यंत अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये १ लाख ६१ हजार १६७ क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. गेल्या वर्षीच्या सोयाबीनची १ ऑक्टोबर २०२१ ते ३० नोव्हेंबर २०२२ या काळात ४ लाख ९७ हजार ५१२ क्विंटल सोयाबीनची आवक झाली होती. भाव आठ हजारावर पोहोचले होते. ते यंदा सहा हजाराच्या आत आहेत.

आवक घसरली नोव्हेंबरमधील सुरुवातीचे तीन आठवडे सोयाबीनची आवकही अधिक होती. बहुतांशदिनी सहा ते सात हजार क्विंटल आवक प्रतिदिन झाली आहे. अखेरच्या आठवड्यात आवक घसरताना दिसली. ती डिसेंबरच्या सुरुवातीपर्यंत निम्म्यावर आली आहे. ३ डिसेंबरला दुपारपर्यंत २८८७ क्विंटल आवक झाली आहे.

बीज तंत्रज्ञानासाठी आग्रही सोयाबीनचे भाव सहा हजारांपर्यंतही पोहोचू शकले नाहीत. साठ्यावरील मर्यादा, वायदे बाजारावर बंदी, पोल्ट्री उद्योगाचा सततचा दबाव या बाबी दर नियंत्रणात ठेवण्यासाठी कारणीभूत आहेत. बाजारपेठा खुल्या करण्याचा आग्रह शेतकऱ्यांनी धरला पाहिजे. सोबतच अतिवृष्टी व पाण्याचा ताण सहन करू शकतील, अशा जनुक सुधारित आधुनिक बीज तंत्रज्ञानासाठी आग्रही रहायला हवे. - डॉ. नीलेश पाटील, अध्यक्ष, शेतकरी संघटना युवा आघाडी

बातम्या आणखी आहेत...