आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिल्हाधिकारी थेट पोहोचल्या शेंदूरजनाघाट नगर परिषदेत:विकास कामांची केली पाहणी; विविध उपक्रमांसंदर्भात केली चर्चा

अमरावतीएका महिन्यापूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीच्या जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आज, मंगळवार, 1 नोव्हेंबरला येथील नगरपरिषद कार्यालयाला भेट देऊन शहरामध्ये सुरू असलेल्या विकास कामांची पाहणी केली. स्वच्छ सर्वेक्षण 2023, माझी वसुंधरा-तीन आदी उपक्रमांसंदर्भात त्यांनी चर्चा केली तसेच इतर विकास कामांचा विभाग प्रमुखांकडून आढावा घेतला.

जी विकासकामे वेगवेगळ्या कारणांनी अडली आहेत, त्यासंदर्भात जिल्हाधिकारी पवनीत कौर यांनी आवश्यक त्या सूचनासुद्धा केल्या. त्यानंतर जिल्हाधिकारी पवनीत कौर यांच्या हस्ते नगर परिषद कार्यालयातील स्वच्छता विभागात कार्यरत महिला कर्मचारी यांचे चांगल्या कामगिरीसाठी प्रमाणपत्र देऊन स्वागत करण्यात आले. चर्चेदरम्यान जिल्हाधिकारी यांनी इतर विषयांचाही आढावा घेतला. पाहणी दौऱ्याचा आरंभ करताना त्यांनी सर्वप्रथम घनकचरा व्यवस्थापन केंद्राची निवड केली. तेथे कार्यरत कर्मचाऱ्यांकडून केंद्रावरील सर्व प्रक्रियेचा सविस्तर आढावा घेतला. घनकचरा व्यवस्थापन केंद्रात जिल्हाधिकारी यांच्या हस्ते वृक्षारोपणही करण्यात आले. त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी नगरपरिषद शाळा क्रमांक दोनची पाहणी करून शिक्षकांशी चर्चा केली. शिवाय शाळेविषयी मुद्देही जाणून घेतले.

पुढच्या टप्प्यात नगरपरिषद शेंदुरजनाघाट येथील महात्मा ज्योतीबा फुले उद्यान तसेच हिंदू स्मशानभूमी स्थळांना भेट देऊन पाहणी केली. या संपूर्ण कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी यांच्याबरोबर मुख्याधिकारी रवींद्र पाटील, उपविभागीय अधिकारी नितीनकुमार हिंगोले, नगरपालिका प्रशासन विभागाच्या सहाय्यक आयुक्त गीता वंजारी, शेंदूरजनाघाटचे आरोग्य निरीक्षक रणजीत सोनेकर, शहर सन्मवयक विक्रम खोडके, दीपक दंवडे, कार्तिक होले, कुणाल आठवले व इतर कर्मचारी उपस्थित होते. प्रारंभी त्यांच्या आगमनाबद्दल आनंद व्यक्त करीत जिल्हाधिकारी कौर यांचे नगरपरिषद कार्यालयात मुख्याधिकारी तथा प्रशासक रवींद्र पाटील यांनी पुष्पगुच्छ देवुन स्वागत केले.

आजचा दौरा हा माझ्या नियमित कामकाजाचा एक भाग आहे. नजिकच्या काळात मी जिल्ह्यातील इतर नगरपरिषदांमध्येही जाणार आहे. नगरपरिषद, नगरपंचायती आदी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कामकाजावर लक्ष ठेवणे, योग्यवेळी योग्य अधिकाऱ्यांचा गुणगौरव करणे तसेच नागरिकांच्या हिताची कामे व्हावीत, यासाठी संबंधितांना वेळोवेळी योग्य त्या सूचना करणे हे माझे कर्तव्य आहे, अशा शब्दात जिल्हाधिकारी पवनीत कौर यांना आजच्या दौऱ्याचे वर्णन केले.

बातम्या आणखी आहेत...