आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नवनीत राणांच्या बैठकीत सीपी अनुपस्थित:राणांचे नोटीस बजावण्याचे निर्देश; आरती सिंह म्हणाल्या- माझ्याच कार्यालयात बैठक घ्यायला हवी होती

अमरावती23 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी जिल्हा कचेरीच्या सभागृहात यंत्रणा प्रमुखांची बैठक घेतली. या बैठकीला पोलिस आयुक्त डॉ. आरती सिंह अनुपस्थित होत्या. त्यामुळे राणा दाम्पत्याने नाराजी व्यक्त करीत कायदा व सुव्यवस्थेबाबत कुणाला विचारायचे असे म्हणत नोटीस बजावण्याचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश दिले. तर दुसरीकडे ''मनपा क्षेत्रात कायदा व सुव्यवस्थेचा भाग हा माझ्या अखत्यारित येतो. त्यामुळे त्यांनी माझ्याच कार्यालयात बैठक घेतली असती तर ते योग्य झाले असते'' असे सीपींचे म्हणणे आहे.

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी बुधवारी जिल्हाकचेरीच्या सभागृहात यंत्रणा प्रमुखांची बैठक घेतली. यावेळी बडनेराचे आमदार रवि राणा, जिल्हाधिकारी पवनीत कौर, जिल्हा परिषदेचे सीइओ अविश्यांत पंडा, मनपा आयुक्त डॉ. प्रवीण आष्टीकर, डीसीपी एम.एम. मकानदार आणि जिल्हा पोलिस अधीक्षक अविनाश बारगळ या बैठकीला प्रामुख्याने उपस्थित होते.

शहर व जिल्ह्यात सध्या कायदा व सुव्यवस्थेची स्थिती अडचणीची झाली आहे. खून, मारामाऱ्या, जबरी चोऱ्या असे प्रकार नित्याचेच झाले आहे. या पार्श्वभूमीवर बाप्पांचे विसर्जन निर्विघ्न व्हावे म्हणून जिल्हा प्रशासनाने केलेली तयारी जाणून घेतानाच यंत्रणा प्रमुखांना योग्य त्या सूचना करण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यामार्फत आढावा बैठक बोलावली होती. यावेळी या बाबींचा खुलासा झाला.

खासदार राणा यांच्यामते विसर्जनावेळी बरेचदा शॉक लागणे, पाण्यात बुडणे, दुखापत होणे असे प्रकार घडतात. अशावेळी गणेश भक्तांचे रक्षण करणे आवश्यक आहे. त्यामुळे प्रत्येक विसर्जनस्थळी योग्य ती तयारी असली पाहिजे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. त्याचवेळी प्रशासनातर्फे जे-जे करण्यात आले, त्याची मांडणी सीइओ, मनपा आयुक्त, पोलिस अधीक्षक, डीसीपी व आरोग्य अधिकाऱ्यांनी केली.

विसर्जन सुस्थितीत व्हावे म्हणून सर्वत्र एकाच दिवशी न करता ते 9 ते 12 सप्टेंबर या दरम्यान वेगवेगळ्या दिवशी केले जाणार असल्याचे सांगण्यात आले. विशेषत: 9 व 10 सप्टेंबर रोजी बहुतेक मोठ्या सार्वजनिक मंडळांतील गणपतींचे विसर्जन केले जाणार असून त्यादिवशी विशेष काळजी घेतली जाणार आहे.

गणेश विसर्जन निर्विघ्नपणे पार पडावे म्हणून जिल्हा प्रशासनाने संपूर्ण तयारी केली असून विसर्जनस्थळी आवश्यक बंदोबस्तासह सीसीटीव्ही कॅमेरे, अखंड वीज पुरवठा, अग्निरोधक यंत्रणा आणि काही अघटित घडल्यास तत्काळ सेवा देता यावी, म्हणून डॉक्टर्स व रुग्णवाहिकेची उपलब्धता करुन देणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने आज, बुधवारी स्पष्ट केले.

बैठकीला जिल्हा परिषदेचे सहायक आरोग्य अधिकारी डॉ. ढोले, प्रभारी निवासी उपजिल्हाधिकारी घोडके, मनपाच्या प्रभारी उपायुक्त डॉ. सीमा नेताम, शहर अभियंता रवींद्र पवार यांच्यासह महसूल, पोलिस, मनपा, महावितरण, आरोग्य व जिल्हा परिषदेचे अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.

बातम्या आणखी आहेत...