आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दर्यापुरात SBI बँकेत तांत्रिक बिघाड:इंटरनेट सेवा ठप्प; हजारो खातेधारकांना मनस्ताप

अमरावती3 दिवसांपूर्वी
  • कॉपी लिंक
दर्यापूर येथील भारतीय स्टेट बँक - Divya Marathi
दर्यापूर येथील भारतीय स्टेट बँक

शहरातील भारतीय स्टेट बँकेत तांत्रिक अडचण निर्माण झाल्याने गुरूवारी (दि.24) बँक उघडल्यापासून दिवसभर बँकेचे व्यवहार ठप्प झाले होते. दरम्यान ग्रामीण भागातील आलेल्या निराधार, शेतकरी, वयोवृद्धांना ताटकळत बसावे लागले. शहरातील मोठे व्यावसायीक व नोकरदारवर्गाला दिवसभर बँकेचे व्यवहार सुरळीत होतील या आशेवर ये-जा करावी लागल्याने नाहक त्रासाला समोरे जावे लागले.

शहरात 7 राष्ट्रीयकृत बँकाच्या शाखा आहेत. शहर व ग्रामीण भागातील नागरिकांचे एसबीआय, बँक आँफ महाराष्ट्र व सेन्ट्रल बँक आँफ इंडीया या तीन बँकावरच प्रामुख्याने आर्थिक व्यवहार अवलंबून आहेत. अशा स्थितीत गुरूवार हा आठवडी बाजाराचा दिवस असल्याने बाजार, पेरणी व लागवड केलेल्या पिकांसाठी खते, किटकनाशके, इतर आवश्यक खरेदीसाठी ग्रामीण भागातील नागरिक मोठ्या प्रमाणात येतात. एसबीआय या एका शाखेचे 60 हजारांच्यावर खातेदार असून दरदिवशी हजारो खातेदार व्यवहार व इतर कामासाठी बँकेत येतात. मात्र तांत्रिक अडचण व नेट बंद असल्यामुळे येथील बँक कर्मचारी व खातेदारांना मोठ्या प्रमाणात अडचणींचा सामना करावा लागला.

तर दुसऱ्या छायाचित्रात बँकेच्या गेटवर ग्राहकांसाठी लावलेली सूचना.
तर दुसऱ्या छायाचित्रात बँकेच्या गेटवर ग्राहकांसाठी लावलेली सूचना.

गुरूवारी सकाळपासूनच ग्रामीण भागातून आलेल्या खातेदारांना पैशाची निंतात आवश्यकता होती. मात्र बँकेचे अधिकारी आज तांत्रिक अडचणींमुळे आर्थीक व्यवहार होऊ शकणार नाहीत. छोटा व्यवहार करायचा असले, तर मिनी बँकेत किंवा एटीएमवर जाण्याची सूचना ग्राहकांना देत होते. मात्र ज्या खातेदाराला मोठी रक्कम काढायची, पाठवायची अथवा भरायची असेल त्यांना व्यवहारच करता आला नसल्याने त्यांना आल्या पावली परत जाण्याची वेळ आल्याचे चित्र दिसून आले.

सर्व्हरमध्ये तांत्रिक बिघाड

बँकेच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक अडचण निर्माण झालेली होती. याबाबत वरिष्ठांना कळवले आहे. दैनंदिन व्यवहारासाठी आलेल्या खातेदारांना नाहक गैरसोय व अडचण निर्माण झाल्याने आम्हालाही खंत आहेच. दुरूस्तीचे काम सुरू आहे. त्यामुळे बँकेचे व्यवहार लवकरच सुरळीत होतील.

-प्रफुल्ल इंगोले, शाखा व्यवस्थापक, एसबीआय, दर्यापूर

मिनी बँकेचे सर्व्हरही दुपारपर्यंत होते बंद

दर्यापुरातील भारतीय स्टेट बँक मुख्य शाखेचे तांत्रिक अडचणीमुळे गुरूवारी सर्वच व्यवहार बंद होते, तर दुसरीकडे ठिकठिकाणच्या मिनी एसबीआय बँकचे सर्व्हदेखील दुपारपर्यंत बंद होते. दुपारनंतर मिनी बँकेत काही मोजक्या ग्राहकांना आपले दैनंदिन व्यवहार कसेबसे करता आले.

बातम्या आणखी आहेत...